गरीब विद्यार्थ्यांसाठी पहिलवानांनी थोपटले दंड

संपत मोरे
सोमवार, 8 जुलै 2019

दुष्काळाच्या कायम छायेत असलेल्या बीड जिल्ह्यातील शिवणी गावातील रखरखत्या झळा कमी करण्याचा प्रयत्न पुण्याच्या दोन पहिलवानांनी केला आहे.

पुणे -  दुष्काळाच्या कायम छायेत असलेल्या बीड जिल्ह्यातील शिवणी गावातील रखरखत्या झळा कमी करण्याचा प्रयत्न पुण्याच्या दोन पहिलवानांनी केला आहे. शैक्षणिक साहित्यापासून वंचित असलेल्या या गावातील पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च पंकज हारपुडे आणि अक्षय शिंदे या दोन मल्लांनी उचलण्याचा निर्धार केला. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याची प्रेरणा त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यापासून घेतली आहे. दोन वर्ष त्यांनी शिवणी गावातील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे. 

मूळ शिवणी गावचे; पण सध्या पुण्यात असलेले अक्षय शिंदे यांना गेल्या आठवड्यात गावातील शिक्षकांनी फोन करून गावातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी गावातील काही मुलं साहित्य नसल्यानं शाळेत येऊ शकत नाहीत, असं सांगितलं. शिक्षकांनी गावातील विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्यावर अक्षय शिंदे आणि पंकज हारपुडे यांनी त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरवले. शिवणी गावात जाऊन त्या शाळेतील १०० विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तके, वह्या, पाण्याची बाटली, कंपास असे साहित्य दिले. 

याबाबत बोलताना हारपुडे यांनी सांगितले की, पोलिस अधीक्षक पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात वाचनालय स्थापन केल्याचे मला महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी सांगितले होते. ते ऐकून मला काहीतरी विधायक काम करण्याची प्रेरणा मिळाली. आता आम्ही शिवणी गावातील कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी काहीही मदत लागली तर त्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत. पुढील दोन वर्षांचा खर्च आम्ही उचलणार आहे. 

शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही त्या दिवशी शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर जे हास्य बघितले, तेच आमच्यासाठी मोलाचे आहे. आम्हाला जे शक्‍य आहे ते आम्ही करू.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrestlers help poor student