येवल्याच्या पैठणीतली "अस्मिता'

निशा वाबळे
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

"आपण नोकरी करण्यापेक्षा दहा जणांचं घर चालवतो हे बेस्ट काम आहे' अशी कॉम्प्लिमेंट तिचे फ्रेंड्‌स देतात. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून पैठणीच्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर पोचणाऱ्या अस्मिताबद्दल...

अस्मिता गायकवाड हे पैठणीच्या क्षेत्रात वेगानं मोठं होत असलेलं आश्‍वासक नाव. आई-वडिलांप्रमाणे नोकरी न करता तिने व्यवसायात पदार्पण केले ते स्वतःच्या हिमतीवर. घरच्यांची साथ होतीच; पण तिने व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभं केलं ते पंतप्रधान ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत 25 लाख रुपयांचं कर्ज काढून. नाशिक, नगर आणि नंतर पुण्यात शिक्षण झाल्यानंतर अस्मिताला लक्षात आले, की तिला काहीतरी वेगळे करायचे आहे. 2008 मध्ये ती पैठणीचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या येवल्यात गेली. शांतिलाल भांडगे यांनी तिला पैठणीसंदर्भात शिक्षण दिले. "व्यवसाय करताना फक्त भांडवल गरजेचे नसते तर आवश्‍यक असते व्यवहारकुशलता' या अर्थशास्त्राच्या सिद्धांताची तिला माहिती होती. आपण जो व्यवसाय करणार आहोत त्यात आपण काय व कसं करू शकतो, याचा दीड वर्ष अभ्यास केल्यानंतर अस्मिताने पाच हातमाग सुरू केले.

साडीपेक्षा आपण पैठणी, ड्रेस, कुर्ता आणि दुपट्टा विक्रीला सुरवात करू, असा अस्मिताने विचार केला. त्या वेळी तिला मार्केटिंगची संधीही मिळाली. घाटकोपर येथील मॉलमध्ये पैठणी विक्रीसाठी संधी मिळाली आणि या संधीचे तिने सोने केले. त्यानंतर तिच्या व्यवसायाचा प्रवास यशाची उंची गाठत गेला. ती महिन्याला 50 कुर्ते बनवत होती. मात्र, श्रीमंतच लोकांना हे कुर्ते परवडत. त्यामुळे लोक फॅब्रिकमध्ये इंटरेस्टेड असल्याचं समजलं आणि तिने फॅब्रिक विक्रीला सुरवात केली.

येवल्यात 2010 मध्ये "पैठणी पर्स' सर्वप्रथम अस्मितानेच आणली. या पर्ससाठी डिझायनरला भेटून त्यावर प्रयोग केले आणि तिचा हा प्रयोगही यशस्वी झाला. काही काळानंतर पैठणी साडी विक्रीला सुरवात केली. 20 ते 25 शेड्‌समधील विविध रंगांमध्ये अस्मिताची पैठणी बाजारात उपलब्ध आहे.
पारंपरिक कला शिकविणारी सिस्टिम आपल्याकडे नाही, यासाठी अस्मिताने इन्स्टिट्यूटही सुरू केले. येथून शिकून बाहेर पडणाऱ्या मुलांना- कारागिरांना तिच्याकडे नोकरी मिळाली. आपल्यामुळे दहा लोकांचं घर चालतं, रोजगार उपलब्ध होतो याचा तिला आनंद आहे. व्यवसायात समस्या रोजच येते; पण त्यावर उपायही सापडतात. पैठणी पूर्ण मनुष्यबळावर अवलंबून असते. त्यामुळे अचानक समस्या उद्‌भवू शकते, यावर मात करण्याला ती शिकली आहे. वयाच्या 33 व्या वर्षापर्यंत स्वबळावर व्यवसायात उंची गाठणारी अस्मिता गायकवाड तरुणांसाठी प्रेरणा आहे.

Web Title: yeola paithani