ज्येष्ठांसाठी राबणारे ‘यंग सिनिअर’!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटुंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो ‘यंग सिनिअर्स’ पाहायला मिळतात. काही जण याला अपवादही आहेत. रत्नाकर राऊत हे अशाच व्यक्‍तींपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. इतकेच नव्हे, असंख्य ज्येष्ठांची काळजी घेत तीन लाखांची देणगी देऊन मनाचा मोठेपणाही दाखविला.

नागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटुंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो ‘यंग सिनिअर्स’ पाहायला मिळतात. काही जण याला अपवादही आहेत. रत्नाकर राऊत हे अशाच व्यक्‍तींपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. इतकेच नव्हे, असंख्य ज्येष्ठांची काळजी घेत तीन लाखांची देणगी देऊन मनाचा मोठेपणाही दाखविला.

ज्येष्ठ मंडळींसाठी आदर्श उदाहरण ठरलेल्या राऊत यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. अमृत वर्षानिमित्त रविवारी (ता. २२) त्यांचा सत्कार होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा जगाला परिचय होणे आवश्‍यक आहे. कधीकाळी जीवन शिक्षण विद्यालयात शिक्षणाचे धडे देणारे राऊत २००१ मध्ये निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर माजी खासदार दत्ता मेघे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सेलची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ‘सेकंड इनिंग’ सुरू केली. परिषदेच्या माध्यमातून ते ज्येष्ठ सहकाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविताहेत. त्यांनी आतापर्यंत ३० हजार ‘यंग सिनिअर्स’ना ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून दिले असून, पाच हजारांवर नेत्रशस्त्रक्रिया आणि एक हजार चष्मे वाटप केले आहेत. शिवाय दर मंगळवारी मेघे समूहाच्या वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ज्येष्ठांना नेऊन त्यांच्यावर मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार करीत आहेत. ज्येष्ठ सहकाऱ्यांसाठी ते इतरही अनेक कल्याणकारी उपक्रम राबवीत आहेत.

महाराष्ट्र फेस्कॉमच्या कार्यकारी मंडळावर असलेले राऊत म्हणतात, आज अनेक घरांमधील ज्येष्ठांमध्ये एकटेपणाची भावना आहे. त्यांना कुटुंबीयांकडून हवी असलेली आपुलकी व प्रेम मिळत नाही. विरंगुळाचे साधन नसल्यामुळे वेळ कसा घालवायचा, हा त्यांच्यासमोर प्रश्‍न असतो. त्यांची काळजी लक्षात घेता राऊत यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ व विरंगुळा केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तीन लाख रुपये देणगी देऊ केले आहेत. रविवारी होणाऱ्या कृतज्ञता मेळाव्यात ते तीन लाखांचा धनादेश सुपूर्द करणार आहेत. या रकमेतून ज्येष्ठांसाठी क्रीडा व मनोरंजनाचे साहित्य खरेदी केले जाणार आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनाही त्यांनी शॉल, बुके किंवा भेटवस्तू न आणण्याची विनंती केली. त्याऐवजी पाचशे रुपये देऊन मंडळाचे आजीवन सदस्य बनण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठांचा कृतज्ञता मेळावा
श्री रत्नाकर राऊत अमृतमहोत्सव समिती व पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागच्या (फेस्कॉम) विद्यमाने रविवारी रत्नाकर राऊत अमृतमहोत्सव व ज्येष्ठांचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सत्कार समारंभ सकाळी अकराला शंकरनगर येथील साई सभागृहात होईल. माजी खासदार दत्ता मेघे प्रमुख अतिथी राहतील. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, माजी आमदार गिरीश गांधी, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार व वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान महाविद्यालयाच्या माजी संस्कृत प्राध्यापिका कुमुदताई पावडे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Young Senior for senior citizens