मालक म्हणून काम करण्याची इच्छा आली कामी; केलं असं काही... वाचा सविस्तर

एकनाथ पवार
शनिवार, 25 जुलै 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुर्ली गावठणवाडी येथील दशरथ पाटील आणि पुतण्या पराग पाटील यांचे उदाहरण त्यात घ्यावे लागेल. एकेकाळी मुंबईला वास्तव्य असलेल्या पाटील यांची धरण प्रकल्पात बहुतांश जमीन गेली.

कोकणात दुग्धव्यवसाय  म्हणावा तसा विकसित झालेला नाही. तरीही अनेक शेतकरी प्रयत्नावादातून त्यातून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करताहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुर्ली गावठणवाडी येथील दशरथ पाटील आणि पुतण्या पराग पाटील यांचे उदाहरण त्यात घ्यावे लागेल. एकेकाळी मुंबईला वास्तव्य असलेल्या पाटील यांची धरण प्रकल्पात बहुतांश जमीन गेली. तरीही गावी परतून त्यांनी दीड एकरांत गायी- म्हशींचे संगोपन सुरू केले. डेअरी, दूध संकलन, इतरांना प्रोत्साहन, थेट विक्री असे विविध प्रयत्न करून कोकणात दुग्धव्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुर्ली हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले वैभववाडी तालुक्यातील छोटेसे गाव आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण या गावावर केली आहे. इथली भौगोलिक रचना डोंगरदऱ्याची आहे. काही वर्षांपूर्वी देवधर मध्यम प्रकल्प याच गावात उभारला गेला. त्यामुळे गावातील ५० टक्क्यांहून अधिक लोक विस्थापित झाले. अनेकांची शेतजमीन धरणामध्ये गेली. त्यामुळे शेतीसाठी अशी जमीन शिल्लक राहिलेली नाही. गावातील पाटील कुटुंबीय त्यातीलच एक आहे. त्यांचीही सुमारे १५ एकर जमीन या प्रकल्पात गेली. आता डोंगरभागातील काही जमीन वगळता शेतीयोग्य अशी दीड एकरच जमीन त्यांच्याकडे शिल्लक आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुग्धव्यवसायाचा पर्याय 
दशरथ पाटील हे व्यवसायानिमित्त मुंबई येथे होते. त्यांचे गावी येणे-जाणे होत असे. सन २०१०-११ नंतर मात्र विविध उत्सव, घरगुती कामे या निमित्ताने गावाकडील फेऱ्या वाढल्या. गावाची ओढ अधिक घट्ट झाली. ज्या ज्या वेळी ते गावी येत असत त्या  वेळी ते गावातील शेतकरी व त्यांच्या शेतीचा अभ्यास करीत असत. त्यातूनच दुग्धव्यवसायाला इथे अधिक संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  सन २०१६ मध्ये गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 

Image may contain: outdoor

ग्राहकांकडून प्रतिसाद 
सध्या अर्धा लीटर, एक लीटरचे पॅकिंग करून पराग गावापासून १५ ते २० किलोमीटरवर असलेल्या वैभववाडी बाजारपेठेत दुचाकीवरून जातो. तेथे बाजारपेठेत फिरून दूधविक्री होते. सुरुवातीचे काही दिवस त्याला खूप कष्ट करावे लागले. परंतु जसेजसे ग्राहकांना ताजे दूध मिळू लागले तसतशी मागणी देखील वाढू लागली. सुरुवातीला पाच ते सहा लीटर दुधाची विक्री कशीबशी व्हायची. त्यानंतर ती तीस लीटर पेक्षा अधिक होऊ लागली. दुधाचा ग्राहकवर्ग तयार झाला. संघाला दूध देण्यापेक्षा या विक्रीतून प्रति लीटर दहा रुपये अधिक मिळू लागले. दुधाची वाढती मागणी लक्षात घेऊन बाजारपेठेतही अगत्स्य दूध विक्री केंद्र सुरू केले. अनेक ग्राहक केंद्रावर येऊन खरेदी करतात.

कोरोनाचे संकट हीच मानली संधी; अन् सोडली नोकरी...वाचा सविस्तर

गोठ्याची बांधणी  
कुर्ली गावठणवाडी येथे घरापासून काही अंतरावर पाटील यांची दीड एकर जमीन आहे. त्यातच गोठा उभारण्यास सुरुवात केली. सुमारे ६० बाय ३० फूट आकाराचा गोठा उभारण्यात आला. तो बांधताना सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. गोठ्यात स्वच्छता ठेवण्यास कोणतीही अडचण भासणार नाही अशा पद्धतीने बांधकाम केले आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवते हा विचार करून  गोठ्यात पंखे, तुषार सिंचन, उष्णतारोधक छत यांची सोय केली. कडबा कुट्टी यंत्र खरेदी केले. विंधन विहीर खोदून पाण्याची व्यवस्था केली.

व्यवसायात आली ऊर्जा 
जिल्ह्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होतो. परंतु उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासते. त्यामुळे गोठ्या सभोवतालच्या जमिनीत हिरव्या चाऱ्यांची लागवड केली आहे. त्यातून पशुखाद्यावरील खर्च कमी केला आहे. व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून सहा लाख रुपये किमतीचा टेम्पो तर दुचाकी खरेदी केली आहे. वैरण आणणे, दूध विक्री, खाद्य व व अन्य कामांसाठी त्याचा वापर होतो. दुग्धव्यवसायाला ऊर्जा मिळाल्याने कुकूटपालनालाही चालना मिळाली. सध्या १०० कोंबड्या तर पाच शेळ्या आहेत. शेळीपालनाचाही मानस आहे. दुधाबरोबर शेणखतही उपलब्ध होते. चारापिकांसाठी वापर करून उर्वरित विक्री केली जाते. कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा वाढला नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी केलेले हरतऱ्हेचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

कोरोनावर मात केलेल्या रसिका यांचा सल्ला; घाबरू नका; मानसिकदृष्ट्या खंबीर रहा

नोकरीपेक्षा शेती चांगली 
पाटील यांचा पुतण्या पराग मुंबईत वास्तव्यास होता. ‘हॉटेल मॅनेजमेंट’ ची पदवी घेतल्यानंतर तो एका नामांकित हॉटेलमध्ये नोकरी करायचा. पाटील यांनी त्याला आपल्या घरच्या दुग्धव्यवसायाविषयी कल्पना दिली. परागला देखील ग्रामीण जीवनशैलीत रस होता. नोकरीपेक्षा आपण मालक म्हणून काम करावे व शेतीतच करियर घडवावे असे ठरवून गावी यायचे निश्‍चित केले. आता या व्यवसायात तो मन लावून कार्यरत आहे. गोठा व्यवस्थापनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतची जबाबदारी तो सांभाळतो. 

कुटुंबीयांचे पाठबळ 
दुग्धव्यवसाय करायचा म्हटल्यानंतर गोठा, पाण्याची व्यवस्था, हिरवा चारा, खाद्य आदी गोष्टींची आवश्‍यकता होती. त्यासाठी मोठा खर्च येणार होता. परंतु पाटील यांना पत्नी, मुलगी, जावई आणि मित्रमंडळी अशा सर्वांनी सहकार्य व बळ देण्याचे ठरवले. कुणी गोठ्याचा, कुणी जनावरे खरेदीचा तर कुणी अन्य खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे कुठल्याही बँकेचे कर्ज न घेता पायाभूत सुविधांची उभारणी केली.

दुग्धव्यवसाय
सुरुवातीला दोन गायींची खरेदी केली. प्रतिदिन १५ लीटर दूध मिळू लागले. आणलेल्या गायींना वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काम सुरू केले. सर्व दूध ते डेअरीला  द्यायचे. परंतु पुढे तांत्रिकदृष्ट्या गोपालन परवडेनासे झाले. त्यानंतर म्हशी खरेदीचा निर्णय घेत आठ म्हशी खरेदी केल्या.

Image may contain: grass, plant, outdoor and nature, text that says "चारा पिकांची लागवड"

इतरांनाही दिले प्रोत्साहन  
पाटील यांनी स्वतःबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय करावा यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश देखील आले. काही शेतकऱ्यांनी गायी, म्हशी खरेदी केल्या. परंतु दूध विक्रीसाठी त्यांना शेतकऱ्यांना बाजूच्या घोणसरी गावात जावे लागत असे. ही समस्या लक्षात घेऊन पाटील यांनी गावातच अगत्स्य दूध संस्थेची स्थापना केली. त्यातून  शेतकऱ्यांची तीन- चार किलोमीटरची पायपीट थांबली. संस्थेसाठी पाटील यांनी स्वखर्चाने इमारत बांधली. 

थेट विक्रीचा पर्याय
उच्च हंगामात दररोज प्रतिदिन ५० लीटरपर्यंत दूध संकलन होते. सध्या ते २५ लीटरपर्यंत येऊन ठेपले आहे. मध्यंतरीच्या काळाच या डेअरीला पुरवठा होणाऱ्या दुधाचे संकलन परजिल्हयातील दूध संघाकडून केले जायचे. अचानक गायीच्या दुधाचे दर कमी झाले. त्यामुळे संघाने गावातील संकलन बंद केले. त्यामुळे पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला. यावेळी पाटील यांनी थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी परागने पुढाकार घेतला. ग्राहकांना ताजे दूध दिले तर ते नक्कीच घेतील अशी त्याला आशा होती. त्यासंदर्भात एक पत्रक काढून त्याने संपूर्ण बाजारपेठेत लोकांना वाटले. त्याचा चांगला परिणाम झाला.

पराग पाटील, ९३७३६३३७५४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Parag Patil positive story dairy business in kokan region