युवकांनी भागवली भुकेलेल्यांची भूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

सातारा - आजच्या युवकांवर बेजबाबदारपणाचा अनेक वेळा आरोप केला जातो. तसा काहीसा प्रवादही समाजात आहे. मात्र, या प्रवादाला छेद देत साताऱ्यातील काही युवक विधायक उपक्रम राबवून समाजाचे कौतुक मिळवत आहेत. शिवजंतीस अजिंक्‍यताऱ्यावर वृक्ष संवर्धन करणाऱ्या "युथ पॉवर ऑफ सातारा ग्रुप'च्या कार्यकर्त्यांनी पॉकेट मनीतून शहरातील भुकेल्यांची भूक भागविण्याचा उपक्रम नुकताच राबविला. 

सातारा - आजच्या युवकांवर बेजबाबदारपणाचा अनेक वेळा आरोप केला जातो. तसा काहीसा प्रवादही समाजात आहे. मात्र, या प्रवादाला छेद देत साताऱ्यातील काही युवक विधायक उपक्रम राबवून समाजाचे कौतुक मिळवत आहेत. शिवजंतीस अजिंक्‍यताऱ्यावर वृक्ष संवर्धन करणाऱ्या "युथ पॉवर ऑफ सातारा ग्रुप'च्या कार्यकर्त्यांनी पॉकेट मनीतून शहरातील भुकेल्यांची भूक भागविण्याचा उपक्रम नुकताच राबविला. 

साताऱ्यातील "युथ पॉवर ऑफ सातारा ग्रुप'चे बहुतेक कार्यकर्ते हे कोणत्या ना कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. हे शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. दिवाळीत फिरस्त्यांना फराळाचे पदार्थ देण्यापासून ते श्रमदानातून स्वच्छतेपर्यंत विविध उपक्रम ते राबवतात. दर वर्षी ते अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतात. या वर्षी त्यांनी अजिंक्‍यतारा किल्ल्यावर नागरिकांनी लावलेले रोपांना पाणी घालून त्यांना कुंपण घालण्याचा उपक्रम राबविला. त्यासाठी ग्रुपमधील युवक- युवकी किल्ल्यावर अनेक तास राबले. शहरातून फिरताना विविध ठिकाणी या युवकांना भुकेले फिरस्ते, नागरिक नेहमीच दिसत. या भुकेलेल्यांना शक्‍य होईल तेव्हा जेवण दिले तर... हा प्रश्‍न अनेकांच्या मनात येत होता. चर्चेत या भुकेल्यांना अन्न, विविध पदार्थ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शहरात अन्नाची भुकेले आढळणाऱ्या मोळाचा ओढा, बस स्थानक, राधिका रस्ता, राजवाडा परिसर, शनी मारुती मंदिर, पोवई नाका, गोडोली नाका, साईबाब मंदिर, विसावा नाका, बॉंबे रेस्टॉरंट चौक, वाढे फाटा अशी ठिकाणे त्यांनी निश्‍चित केला. ग्रुपमधील सर्व मुलांनी चार- पाच जणांचे ग्रुप केले. स्वतःच्या पॉकेट मनीतून त्यांनी साठविलेले पैसे एकत्र केले. त्यातून अन्न, पदार्थ विकत घेतले आणि विविध ठिकाणी सुमारे 50 हून अधिक भुकेल्यांची त्यांनी भूक भागविली. 

एक वेळ अन्न देऊन त्यांची भूक कायमची भागणार नाही. मात्र, युवकांचा हा विधायक उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. या उफक्रमात ग्रुपचे संस्थापक वैभव धुमाळ, रोहित भंडारे, अक्षय देसाई, सुजित माने, निखिल वाघमारे, रूपेश सावंत, मीनाक्षी घोरपडे, सोनाली कांबळे, मंदिरा इंदलकर, स्नेहल भोसले, अक्षदा पवार, रक्षा कुलाल, प्रगती मुळीक, स्वरा कीर्तकर, नमित गांधी, शिवानी लावंघरे आणि मार्गदर्शक श्री. शेंडे सर सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Power Group of Satara workers