नववधूच्या मंगळसूत्राचे हरवलेले ५० हजार युवकाकडून परत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मुलीच्या विवाहासाठी मंगळसूत्र खरेदीस कोल्हापुरात आलेल्या एका बापाच्या खिशातील ५० हजार रोकड पडली. ही रक्कम नंदगाव (ता. करवीर) येथील तरुणाला व्हीनस कॉर्नर परिसरात सापडली. त्याने ती प्रामाणिकपणे परत केल्यानंतर मुलीच्या बापाने ‘माझ्या आयुष्यभराची पुंजी होती ही 
बाळा, तुझे आभार कसे मानायचे हे कळत नाही...’ अशा शब्दांत तरुणाचे आभार मानले.

कोल्हापूर  - मुलीच्या विवाहासाठी मंगळसूत्र खरेदीस कोल्हापुरात आलेल्या एका बापाच्या खिशातील ५० हजार रोकड पडली. ही रक्कम नंदगाव (ता. करवीर) येथील तरुणाला व्हीनस कॉर्नर परिसरात सापडली. त्याने ती प्रामाणिकपणे परत केल्यानंतर मुलीच्या बापाने ‘माझ्या आयुष्यभराची पुंजी होती ही बाळा, तुझे आभार कसे मानायचे हे कळत नाही...’ अशा शब्दांत तरुणाचे आभार मानले. अक्षय बापूसाहेब चव्हाण (वय २५) असे त्याचे नाव आहे.

माणगाव (ता. हातकणंगले) येथील अनिल मन्ने (वय ६०) यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. लग्नासाठी त्यांनी पै पै जमा करत ५० हजार रुपये जमा केले होते. मुलीसाठी मंगळसूत्र खरेदीसाठी ते पैसे घेऊन कोल्हापुरात आले होते. व्हीनस कॉर्नर येथे त्यांच्या खिशातून ती रक्कम रस्त्यावर पडली. नंदगाव (ता. करवीर) येथील अक्षय चव्हाण याच परिसरात खासगी नोकरी करतात. ते कामानिमित्त व्हीनस कॉर्नर येथे गेले होते.

त्या वेळी त्यांना पैसे सापडले. त्यांनी ही माहिती पानटपरी मालकाला दिली. कोणी पैसे शोधत आले तर ते माझ्याकडे आहेत. त्यांना माझ्याकडे पाठवा, असा निरोप देऊन ते कामावर निघून गेले. दरम्यान, धास्तावलेले मन्ने पैशाच्या शोधात व्हीनस कॉर्नर येथे आले. त्यावेळी पानटपरी मालक त्यांना अक्षय चव्हाण यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी त्यांना प्रामाणिकपणे पैसे परत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youths honesty in Kolhapur human interest special story

टॅग्स