काळ बदलला...सणाचे रुपही पालटले 

काळ बदलला...सणाचे रुपही पालटले 

शिरोडा : 'बाबल्या बाजारातसून येताना माटयेक बांधूक आठवणीन 'चिपटा' घेऊन ये, गुदस्ता इसारललय तू'. सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या बाबल्याच्या आईने माटवीचे सामान आणण्यासाठी बाजारात जाणाऱ्या बाबल्याला आठवण करुन दिली.

मुंबईवासीय बाबल्याबरोबर त्याचा मुलगा होता. आजीचे सांगणे चालू असतांना तो बाबल्याच्या तोंडाकडे बघत राहिला होता. 'माटयेक' 'चिपटा' 'गुदस्ता' हा काय प्रकार आहे असे प्रश्‍न त्याच्या मनात घर करुन राहिले होते. सण तोच, उत्सव तोच पण साजरा करण्याची पद्धत कालमानपरत्वे बदलत चालली आहे. म्हणून हे असे घडतंय काय? 

गणेशोत्सव हा कोकणवासियांचा विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचा खास उत्साहाचा आणि मोठाला सण. त्यासाठी मुंबई, पुणे, गोवावासीय चाकरमानी खास रजा घेऊन मुलाबाळांसह आपापल्या गावी येतात. आज प्रवासाची बरीच साधने झाली, कित्येक जण छोट्या गाड्या घेऊन येतात. प्रवास झटपट आणि सोईस्कर झाला आहे; परंतु 35-40 वर्षापूर्वीच्या काळात डोकावले तर त्या काळात राज्य परिवहन मंडळाची एसटी हेच एकमेव साधन होते.

गणेश चतुर्थीसाठी मुंबई सेंट्रल, परेल डेपोतून गावोगावी जादा एसटी गाड्या सोडल्या जायच्या. रात्री उशिरा त्या गावी पोचायच्या. पुढे ग्रामीण भागात जायला रिक्षा असा प्रवास घडायचा. आज चाकरमानी गाडी त्याच्या घरापर्यंत जाते. त्याकाळी एकच कुटुंब, त्यात मातीचे कौलारु घर. चतुर्थीच्या अगोदर किमान आठ दहा दिवस अगोदर घरात साफसफाईला सुरवात व्हावयाची. त्यानंतर रंगरंगोटी, माटवी, गणरायाचे आसन आधार- लाकडी बाक ठरलेला असायचा तो आदल्या दिवशी धुवायचा कारण तो धुतल्यावर त्यावर कोणी बसायचे नाही- एकदम गणपती विराजमान होणार अशी पद्धत होती.

आज त्या घराच्या जागी दगडी आरसीसी घर उभे राहीले, फरशी घालून गणपतीचे आसन कायमस्वरुपी झाले. पूर्वी वळयंत गणपती पूजन व्हायचे, आता गणपतीची खोली निर्माण करण्यात आली, माटवीचा आकार छोटा झाला, बांधल्या जाणाऱ्या वस्तूंच्या संख्येत घट होऊ लागली. कालमानापरत्वे बदल होत असला तरी केरवाडीतील एका गणेशभक्ताने माटवीला बांधण्यासाठी साधारणपणे आठ किलो वजनाचा फणस चक्क शंभर रुपये खर्चुन खरीदला. विशेष म्हणजे त्यांचा गणपती अकरा दिवसांचा आहे ही पण हौस नसे थोडकी. याच केरवाडी भागातील गणेशोत्सवाचे वैशिष्ठ असे की, या भागात पूर्वी गणपतींची संख्या कमी होती. आज घरांची संख्या वाढती तशी गणपतींची संख्याही वाढली. मोठ्या आकाराचे गणपती विराजमान केले जातात. मासेमारी हा या लोकांचा मुख्य व्यवसाय असे असताही घरात अकरा दिवसांचा गणपती असतो. 

जवळपास पन्नास वर्षांपूर्वी गणपतीसमोर ट्रिकसीनचे चलत देखावे सजविले जायचे आणि ते बघण्यासाठी आजुबाजूच्या गावातील गणेशभक्तांची गर्दी व्हावयाची. त्याकाळी आजच्यासारखी वाहने नव्हती; मग भाड्याची सायकल घेऊन जाणे, तो देखावा पहाणे याचा आनंद काही औरच होता. भजनी मंडळी डोक्‍यावर बाज्यापेटी घेऊन बॅटरीच्या झोतात गणेशभक्तांच्या घरी जावयाचे. आजकाल गाडी कुठपर्यंत येते याची प्रथम विचारणा केली जाते. 

बदलत्या परिस्थितीनुसार घरांची संख्या वाढली. तशी गणपतींची संख्याही वाढती आहे. त्याकाळी मातीचे हाती गणपती बनविले जायचे. आज पेण पनवेलचे गणपतींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याकाळी दारूसामानात फटाके मोठ्या प्रमाणात असायचे. बच्चे कंपनी 'पेटारा' विसवून एक एक फुगोटी वाजविण्यात अधिक रस घ्यायचे. आज पेटाराच्या जागी पाचशे, हजारांची माळ, आकाशात फुटणारे शॉट मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. गणेशोत्सव हा कोकणी माणसांचा उत्साहाचा, आनंदाचा आदी मोठाला सण...तो साजरा करण्यासाठी गणेशभक्त कदीच हात आखुडता घेत नाही, स्वतःच्या त्याचबरोबर मुलाबाळांच्या हौसेखातर हजारो रुपये खर्च करतो. आजोबांच्या वेळेचे काटकसरीचे जीवन इतिहासजमा होऊ लागले आहे ही अभिनंदनीय बाब आहे. गणपतीमूर्ती आणणे, विसर्जनास नेणे यासाठी आता चारचाकी वाहनांचा, बॅंजोवाद्यांचा वापर होऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com