विघ्नांवर मात करत चाकरमान्यांचा ओघ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 August 2017

महामार्गावर कोंडी - बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी; पाऊस उडवतोय तारांबळ

कणकवली - राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खड्डे, सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासाचा विलंब तसेच अधूनमधून कोसळणाऱ्या मुसळधार सरी या सर्व विघ्नांवर मात करीत राज्यभरातून सिंधुदुर्गात येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच राहिला आहे.

महामार्गावर कोंडी - बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी; पाऊस उडवतोय तारांबळ

कणकवली - राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खड्डे, सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासाचा विलंब तसेच अधूनमधून कोसळणाऱ्या मुसळधार सरी या सर्व विघ्नांवर मात करीत राज्यभरातून सिंधुदुर्गात येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच राहिला आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली आहे. याखेरीज महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही देखील वेगात सुरू ठेवली आहे. यामुळे यंदा गणेशभक्तांचा प्रवास काहीसा सुखकर सुरू आहे. गणरायाच्या आगमनाला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांची संख्या प्रचंड आहे. यात कोकण रेल्वे प्रवासाला सर्वाधिक पसंती दिली. कोकण रेल्वेमार्गावर १४० विशेष फेऱ्या चालविल्या जात आहेत. यंदा एसटी महामंडळाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडल्या. आज आणि उद्या (ता. २४) सायंकाळपर्यंत १५० बसेस सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांकडून दिली. कोकण रेल्वेने यंदा २५६ विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. याखेरीज खासगी बसेस आणि शेकडो वाहनांतून चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. यंदा पाऊस कमी आहे. तसेच गतवर्षी पेक्षा यंदा पेण येथील भाग वगळता उर्वरित मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत ठेवला असल्याने मोटारी घेऊन येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मोटारी तसेच खासगी बसेस राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी येत असल्याने जिल्ह्यातील खारेपाटण, तळेरे, नांदगाव, कणकवली, कसाल या महामार्गावरील शहरांबरोबरच कुडाळ, मालवण येथेही वाहतूक कोंडीचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. मात्र सर्व ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतली होती. आज दिवसभर मात्र मुसळधार सरी कोसळल्याने, व्यापारी, विक्रेते आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठांतील उलाढाल वाढली आहे. फटाके आणि शोभेच्या वस्तू, चिनी बनावटीची तोरणे, किराणा दुकाने, कापड दुकाने, तसेच फिरते फळ भाजी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होत असून जिल्ह्यातील बाजारपेठांत कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत आहे. यंदा जीएसटीमुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतु गौरी गणपती सणाचा उत्साह असल्याने भाविकांनी दरवाढीकडे दुर्लक्ष केले आहे.

विजेचा लंपडाव आणि पाऊस या विघ्नांवर मात करीत गणेशचित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती रंगविल्या जात आहेत.

महामार्गावर पोलिस पथके
गणेशोत्सावानिमित्त मुुंबई गोवा महामार्गावर पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यात खारेपाटण ते कणकवली या हद्दीमध्ये हुमरट, नांदगाव, तळेरेबाजार, तळेरे पेट्रोलपंप आणि खारेपाटण येथे ५ वायरलेस सेट उभारण्यात आले आहेत. याखेरीज महामार्गावर ७ अधिकारी. ३० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.

रेल्वे मार्गावर आणखी ८ फेऱ्या
गणेशोत्सव काळात गर्दी नियंत्रणासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ८ फेऱ्या चालविल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली. यात मुंबई ते चिपळूण आणि पुणे ते सावंतवाडी मार्गावर प्रत्येकी चार फेऱ्या २१ ते २५ ऑगस्ट या दरम्यान चालविल्या जात आहेत. गणेशोत्सवात रेल्वे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनानेही रेल्वे मार्गावर गस्त वाढविली आहे. तसेच मडगाव आणि रत्नागिरी येथे कंट्रोल रूम उभारला आहे. तसेच सर्वच गाड्यांमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि कणकवली या स्थानकांतून प्रवासी उपलब्धतेनुसार एसटी बसेस देखील सोडल्या जात आहेत.

एसटी बस तुडुंब
गणेशोत्सव बाजारासाठी ग्रामीण भागातून तालुक्‍याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत असल्याने सर्वच एसटी बसेस सध्या फुल्ल आहेत. याखेरीज तीन आसनी रिक्षा आणि खासगी वाहनांचा व्यवसाय तेजीत आला आहे. प्रमुख मार्गावरील बसेसमध्ये पाय ठेवण्यास जागा नसल्याने जादा एसटी बसेस सोडण्याचीही मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kankavali konkan news chakarmani rush in market