esakal | शिक्षण सभापती स्वत:च घडवतात गणेशमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

आडिवरे - गणेशमूर्तीवर रंगवताना दीपक नागले.

शिक्षण सभापती स्वत:च घडवतात गणेशमूर्ती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दीपक नागले यांनी जोपासलीय वडिलांची परंपरा; राजकारणाबरोबरच कलेतही हातखंडा

राजापूर - सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मिळणारा अपुरा कालावधी, त्यामधूनही उपलब्ध वेळेचा सदुपयोग करीत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले गणेशमूर्ती घडविण्यामध्ये गुंतले आहेत. सामाजिक क्षेत्रामधील वेळेअभावी कामे रखडल्याचे अनेकजण दाखले देतात. पंधरा वर्षांहून अधिक काळ ते मूर्ती काढत आहेत. 

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची पूर्वतयारी करण्यामध्ये गणेशभक्त गुंतले आहेत. गणेश कार्यशाळांमध्ये कलाकार गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या श्री. नागले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठिकठिकाणी छोटी-मोठी कामे करताना सामाजिक क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कोंडसर बुद्रुकचे सरपंच, शिवसेनेमध्ये विविध पदे मिळविल्यानंतर निष्ठेने काम करून त्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटविला. त्याची पोचपावती म्हणून त्यांना संघटनेने पंचायत समिती सदस्यत्वावरून जिल्हा परिषद सदस्य म्हणून बढती दिली. त्याठिकाणीही त्यांनी यश मिळवून सध्या ते जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी कलागुणही जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. वडील तुकाराम नागले यांनी घरीच सुमारे पंधरा-वीस वर्षापूर्वी गणेश कार्यशाळा सुरू केली आहे. त्यांच्या जोडीनेच नागलेही गणेश कार्यशाळेमध्ये कार्यरत आहे. वृद्धापकाळामुळे त्यांच्या वडिलांना गणेश कार्यशाळा सुरू ठेवणे शक्‍य होत नाही. वडिलांची परंपरा दीपक नागले यांनी सुरू ठेवली आहे. सध्या मूर्ती बनविण्यासाठी साच्यांचा उपयोग केला जातो. मात्र नागले काही गणपती बनविण्यासाठी साच्यांचा उपयोग करतात, अनेक मूर्ती ते हातीच काढतात.