देवरूखच्या मातीतील अजाण लघुपट अंकुर महोत्सवात

देवरूखच्या मातीतील अजाण लघुपट अंकुर महोत्सवात

साडवली -  महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय पाटील याने निर्मिलेल्या लघुपटाला नाशिक येथील फेस्टिव्हलमध्ये जाण्याचा मान मिळाला आहे. यामुळे देवरूखच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. या लघुपटाचे नाव ‘अजाण’ असे आहे.

देवरूखमधील पारावरचे नाटक करणाऱ्या कलाकारांना कॅमेऱ्याचे तंत्र माहीत व्हावे व गुणी कलाकारांना अभिनयाची संधी मिळावी म्हणून आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय मारुती पाटील याने अजाण या लघुपटाची निर्मिती केली आहे. हा लघुपट नाशिक येथील शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये दाखल झाला आहे. देवरूखमधील कलाकारासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. अजाण लघुपटाची थिएटर फ्रेमतर्फे निर्मिती झाली आहे. ‘अजाण’मध्ये अक्षय पाटील याने देवरूखमधील रंगभूमी कलाकारांना संधी दिली आहे. देवरूखमधील संगणक क्षेत्रात कार्यरत असलेले हेमंत साठ्ये यांनी याची निर्मिती केली आहे. सर्व चित्रिकरण कोसुंब गावी पार पडले आहे.

अजाण हा समाजातील एका विकृत गोष्टीवर भाष्य  करणारा लघुपट आहे. ती लहान असताना तिच्यावर बलात्कार होतो. याची फक्त दोन दिवस घराघरात चर्चा होते. पण त्या कोवळ्या अजाण जीवाच्या मनावर काय परिणाम झाले असतील याचा कोणीही विचार करत नाही. विकृत व्यक्तीबाबत ती ही अजाण आणि समाजही अजाण याचे वास्तव या चित्रपटात दाखवले आहे. अजाण मुलीची भूमिका करणारी बालकलाकार जिज्ञासा कनावजे हिने अभिनयात बाजी मारली आहे. पाध्ये स्कूलमध्ये ती चौथीत शिकत आहे. जिज्ञासाबरोबर योगिता प्रभू, शुभंकर देसाई, निरंजन शिंदे, राजन आंबेकर, सुनील जाधव, प्रजुल परळेकर, अक्षय झेपले यांनी भूमिका केल्या आहेत.

संगीताची बाजू संजय शेलार, सुहास भोसले, महेश कांबळे, कुणाल भिडे यांनी सांभाळली आहे. राष्ट्रपाल काकडे यांनी संकलन केले आहे. छायाचित्रणासाठी राष्ट्रपाल काकडे आणि प्रजुल परळेकर, तर डबिंगसाठी संकेत कोरलेकर, उमा कोरलेकर यांनी प्रकाश योजनेसाठी दत्तात्रय जाधव, कमलाकर कनावजे, निरंजन शिंदे, अक्षय झेपले यांचे योगदान लाभले आहे.
अक्षय पाटील याने देवरुखमधील रंगभूमीवरील कलाकारावर विश्वास टाकला आणि तो कलाकारांनी सार्थ ठरवला आहे. आजवर अक्षयने एकांकिका, एकपात्री, राज्य नाट्यस्पर्धा यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com