थिबा राजाची करुण कहाणी येणार रंगमंचावर

मकरंद पटवर्धन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी -  ब्रह्मदेशचा मिडॉन घराण्याचा शेवटचा राजा थिबा याचा रत्नागिरीत करुण अंत झाला. त्याच्या राजघराण्याची वाताहत झाली. राजाच्या या करुण इतिहासाची साक्ष देत भव्य राजवाडा उभा आहे. राजाच्या जीवनातील काही रहस्यमय घटना व कोकणी मानसिकतेचे दर्शन घडवणारे नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार व रत्नागिरीचे सुपुत्र प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे.

यासंदर्भात प्रा. मलुष्टे यांनी सांगितले, माझे बालपण रत्नागिरीत गेले. पुढे नोकरी व फोटोग्राफी करिअर मुंबईत. काही वर्षांपासून थिबा राजा व राजवाड्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम करीत होतो. हळूहळू राजाची करुण कहाणी मला समजू लागली. याच दरम्यान पद्मश्री मधू मंगेश कर्णिक तसेच सुधा शहा यांनी थिबा राजावर लिहिलेले पुस्तक वाचनात आले. या दोघांचीही मी भेट घेतली. त्यांच्याकडून आणखी नवे संदर्भ मिळत गेले. काही संदर्भपुस्तके सापडली. 

पर्यटन महोत्सवात मी थिबा राजावर वृत्तपत्रात लेख लिहिला व त्यावर अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर मग थिबाच्या कहाणीवर नाटक लिहावे असे सुचले.

दोन अंकी नाटक असून दहा पात्रे आहेत. सुमारे चार-पाच महिन्यांत हे नाटक लिहून पूर्ण केले. मला नाट्यसृष्टीचा फारसा अनुभव नाही. महाविद्यालयीन जीवनात हौस म्हणून नाटकात काम केले आहे. व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाचा हा पहिलाच अनुभव ठरणार आहे. याकरिता दिग्दर्शक राम कुंडलीकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. गर्भश्रीमंत, हिरे-माणिक जडजवाहिरांचा मालक असलेला राजा भरजरी वस्रांसह रंगमंचावर अवतरणार आहे.

वाघोटणे येथील वास्तव्यावर प्रकाश हवा
इंग्रजांनी थिबाला मद्रासनंतर सिंधुदुर्गमधील वाघोटणे येथे, रत्नागिरीतील आउटराम बंगला व राजवाड्यात स्थलांतरित केले. या सर्वच ठिकाणांतील थोडे प्रसंग नाट्यमयरीत्या साकारले आहेत. वाघोटणे येथे रत्नागिरीतील राजवाड्याप्रमाणे वाडा आहे. याची फार माहिती उपलब्ध नसली तरी राजा येथे राहिला होता असे सांगितले जाते. या ठिकाणी भेट देऊन प्रा. मलुष्टे यांनी माहिती मिळवली. या ठिकाणी राजाला फुरसे चावले व एका वैद्याने त्याला बरे केले. त्याबदल्यात वैद्याने सोने, हिरे माणकांऐवजी फक्त नारळ घेतले. रत्नागिरीच्या वास्तव्यातील काही प्रसंग प्रा. मलुष्टे यांनी नाटकात रंगवले आहेत.

Web Title: Ratnagiri News drama on Thiba KIng history