डॉ. कैलास शिंदे पालघरचे नवे जिल्हाधिकारी

विशाल पाटील
बुधवार, 17 जुलै 2019

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली.

सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍नोसॅव्ही सीईओ' मिळणार आहेत. त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने आज रात्री काढला आहे. 
डॉ. शिंदे यांनी शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला. त्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकाची गुणवत्ता चाचणी घेऊन त्यानुसार गुणवत्ता विकासाचा अजेंडा तयार केला. त्याची दखल घेत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी हा उपक्रम पुणे विभागात राबविला, तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत डॉ. शिंदे यांनी प्रभावीपणे कामकाज केले असून, सव्वादोनशे ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प उभा केला, तसेच स्वच्छता अभियानाअंतर्गत देश पातळीवर जिल्हा परिषदेने दोनदा अव्वल कामगिरी केली आहे. बांधकामांचे कामकाजातील प्रक्रिया, तसेच बिल प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा पथदर्शी प्रकल्पही त्यांनी साताऱ्यात राबविला. पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचारही बाहेर काढून तो निधी विकासकामांसाठी वापरला. घरकुले बांधण्याबरोबर शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यावरही डॉ. शिंदे यांनी सातत्याने भर दिला आहे. 
श्री. भागवत हे 1988 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदारपदी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्या वेळी झालेल्या भूकंपानंतर मदत व पुनर्वसनात त्यांनी भरीव काम केले. पदोन्नतीने त्यांनी दाभोळ वीज निर्मिती प्रकल्पावर काम केले. त्या वेळी प्राधान्याने जमीन अधिग्रहणाचे विषय सोडविले. मंत्रालयात शोभा फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणून कामे केले आहे. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, सिडको, तसेच म्हाडा येथे त्यांनी कामकाज केले आहे. म्हाडा येथे लॉटरी सोडतीनंतर नागरिकांना कागदोपत्रांच्या अत्यंत क्‍लिष्ट पद्धतीला सामोरे जावे लागत होते. त्यांनी त्यामध्ये ऑनलाइन पद्धत सुरू करून ती पद्धत अत्यंत सुकर केली. त्यामुळे नागरिकांचा त्रास वाचला. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Kailash shinde appointed as district collector of palghar