कुडाळची श्री देवी केळबाई

अजय सावंत | Saturday, 23 September 2017

जागर नवरात्रोत्सवाचा.... सांस्कृतिक, धार्मिक चळवळीचे माहेरघर म्हणून कुडाळची ओळख आहे. अनेक देवालयामुळे शहराला अनन्य साधारण महत्व आहे. श्री देव कुडाळेश्‍वर, श्री देव भैरव, श्री देवी केळबाई, श्री देवी महालक्ष्मी आदी देवस्थानांचा यात समावेश आहे. श्री देवी केळबाई येथील महत्त्वाचे देवस्थान.

सांस्कृतिक, धार्मिक चळवळीचे माहेरघर म्हणून कुडाळची ओळख आहे. अनेक देवालयामुळे शहराला अनन्य साधारण महत्व आहे. श्री देव कुडाळेश्‍वर, श्री देव भैरव, श्री देवी केळबाई, श्री देवी महालक्ष्मी आदी देवस्थानांचा यात समावेश आहे. श्री देवी केळबाई येथील महत्त्वाचे देवस्थान.

शहरात नवरात्रोत्सवाची धामधुम सुरू झाली असून सार्वजनिक ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र श्री देवी केळबाई मंदिरात देवीचेच स्थान असल्याने या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्रोत्सवाला सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होतात. शहरातील केळबाईवाडीत उत्तुंग असे श्री देवी केळबाईचे मंदिर आहे. खरेतर केळबाईच्या निवासस्थानावरूनच या वाडीला केळबाईवाडी नाव पडले आहे. देवीची मूर्ती प्रतिष्ठापना आणि येथील स्थान याबाबत निश्‍चित स्वरुपाची माहिती मिळत नाही. याबाबत एक आख्यायिका आहे. पूर्वी काही केळीच्या रोपांची वाहतूक करणारी वृद्धा या ठिकाणाहून जात असताना अचानक तिच्या डोक्‍यावरची टोपली जड झाली. टोपलीचा भार सहन न झाल्याने तिने टोपली जमिनीवर ठेवली. यावेळी त्या टोपलीत केळबाईची मूर्ती असल्याचे निदर्शनास आले अशी कथा जाणकार सांगतात. पूर्वी याठिकाणी केळीचे बन होते. यावरून देवीला केळबाई नाव मिळाले असेही काहीजण सांगतात. आजमितीस कुडाळच्या मुळ भूमिका देवीस केळबाई देवी या नावानेच ओळखले जाते. दिमाखदार व लक्षवेधी अशा या मंदिरात नवरात्रोत्सवाबरोबरच हरिनाम सप्ताह, श्री देवीचा वर्धापनदिन सोहळा, इतर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती श्री देवी केळबाईची आहे.