बाप्पाच्या उत्सवासाठी चाकरमान्यांना असे करावे लागणार सुट्ट्यांचे नियोजन

मुझफ्फर खान | Tuesday, 11 August 2020

क्वारंटाईनच्या वाढलेल्या कालावधीमुळे खासगी नोकरदारांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना तब्बल 34 दिवसाच्या सुट्टीचे नियोजन करावे लागले आहे. यातील दहा दिवस गणेशोत्सवासाठी आणि उर्वरित 24 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. क्वारंटाईनच्या वाढलेल्या कालावधीमुळे खासगी नोकरदारांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

चाकरमान्यांना गणेशोत्सव काळात गावी जाण्यासाठी एसटी बसची सोय केल्यानंतर मोठ्या संख्येने चाकरमानी आरक्षण करून कोकणात दाखल होत आहेत. गावी आल्यानंतर त्यांना दहा दिवस सक्तीने क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. नंतरचे दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात जाणार आहेत. गणेशोत्सव साजरा केल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईला परततील. मुंबईत परतणार्‍या चाकरमान्यांना सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.

हेही वाचा- आता फक्त चिंगळांचाच आधार -

त्यामुळे गावी आलेल्या चाकरमान्यांना 34 दिवसाच्या सुट्टीचे नियोजन करावे लागले आहे. अनलॉकमध्ये काही उद्योग आणि खासगी संस्थांचे कार्यालय सुरू झाले. आधीच नोकर्‍यांची शाश्‍वती नसताना गणेशोत्सवाहून परतल्यावर पुन्हा 14 दिवसांची सुटी मिळणे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवापेक्षा क्वारंटाईनचेच दिवस जास्त होत असल्याने चाकरमानी टेन्शनमध्ये आहेत. 24 दिवस क्वारंटाईनचा कालावधी निश्‍चित झाल्यामुळे काहींना दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गाव सोडावे लागणार आहे. तर काहींना पाच दिवसाचे गणेश विसर्जन झाल्यानंतर पुन्हा शहराकडे धाव घ्यावी लागणार आहे. 

हेही वाचा- रत्नागिरीत मुर्तीकलेचा वारसा नसणारा कुंभार -

क्वारंटाइनचा नियम सर्वांच्याच भल्यासाठी आहे. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींने 10 दिवस होम क्वारंटाइन झालेच पाहिजे. असे निर्देश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यानूसार चाकरमान्यांनी दहा दिवस क्वारंटाईन झाले पाहिजे. हे सर्वांसाठी चांगले होईल. 

नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण
 

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी क्वारंटाईनची सक्ती करणे समजण्यासारखे आहे. पण सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे. मुंबई सोडून पळालेले अनेक जण कामाच्या शोधात पुन्हा मुंबईत आलेत. काही कोकणात आलेत. त्यांना सक्तीने क्वारंटाईन केले गेले का हे पाहण्याची तसदीही कुणी घेत नाही. मग गणेशोत्सवासाठी येणार्‍यांनाही सक्ती नसावी. 

योगेश देसाई, चिपळूण

संपादन - अर्चना बनगे