esakal | प्रचितगडावरील शिडीसाठी आमदार शेखर निकम यांच्याकडून १० लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

प्रचितगडावरील शिडीसाठी आ. शेखर निकम यांच्याकडून १० लाखांचा निधी

प्रचितगडावरील शिडीसाठी आ. शेखर निकम यांच्याकडून १० लाखांचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर: प्रचितगडावर जाण्यासाठी नवीन लोखंडी शिडी लवकरच बसणार असून, यामुळे गडावर जाण्याची कसरत कमी होणार आहे. देशाच्या विविध भागातील गिर्यारोहक आणि पर्यटक प्रचितगड पाहण्यासाठी येत असतात. मात्र शेवटच्या टप्प्यात गडावर जाण्याच्या वाटेवरील शिडीची दुरावस्था झाल्यामुळे ती जीवघेणी ठरत आहे. याची दखल आमदार शेखर निकम यांनी घेत शिडीच्या दुरुस्तीसाठी क वर्ग पर्यटनमधून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच रस्त्यासाठीही १० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली.

हेही वाचा: 'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'

संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड हा स्वराज्यातील एक अजिंक्य गड. प्रचितगडावर नेणारी ही शिडी दोन टोकांना जोडण्याचे काम करते. पूर्वी येथे दगडी जिना होता. मात्र त्याच्या पायऱ्या ढासळल्यामुळे अनेक वर्षे गडावर जाताच येत नव्हते. अखेरीस इतिहासप्रेमींनी अथक प्रयत्नांनंतर गडावर जाण्यासाठी शिडी बसविली आणि गिर्यारोहक तसेच पर्यटकांसह हजारो शिवप्रेमी प्रचितगडावर जाऊ लागले.

गेल्या काही वर्षात ऊन, पाऊस आणि वारा यामुळे ही शिडी गंजू लागली आणि एक एक करत नेमक्या सुरुवातीच्याच सहा पायऱ्या तुटून दरीत पडल्या. शिडीने जात असतांना ती हलते. त्यामुळे एकावेळी एकाच व्यक्तीला शिडीवरुन जाता येते. खालच्या बाजूस प्रचंड खोल दरी असल्यामुळे कमकुवत हृदयाची व्यक्ती शिडीवरुन जावूच शकणार नाही. सद्यस्थितीत पायऱ्या मोडून पडलेल्या असतानाच शिवप्रेमी या धोकादायक शिडीवरुन गडावर जा ये करतात.

निविदा निघाल्या

प्रचितगडावर जाण्यासाठी नवीन शिडी बसविणे आणि प्राथमिक स्तरावर रस्ता करणे यासाठी निकम यांनी २० लाखांचा निधी मंजूर करुन घेतला. तातडीने निविदा प्रक्रिया करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने याबाबतची रितसर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

"चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच ऐतिहासिक स्थळांचे जतन करायला हवे. संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगड ही केवळ कोकणची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करत राहू." - शेखर निकम, आमदार

loading image
go to top