नाणी स्वीकारण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सावंतवाडी - दहा रुपयांची नाणी चलनातून बाद होणार आहेत, अशी अफवा सुरू असतानाच आज चक्क येथील स्टेट बॅंकेच्या कार्यालयात नाणी घेण्यास कर्मचाऱ्यांकडून नकार देण्यात आला. येथील युवा उद्योजक सुनील मिशाळ यांना याचा प्रत्यय आला. दरम्यान, त्यांनी याबाबतचे कारण विचारले असता त्यांना असंबद्ध उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. 

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा अचानक बंद केल्यानंतर त्याचा फटका अनेक लोकांना सहन करावा लागला. याच दरम्यान आता दहा रुपयांची नाणीसुद्धा कालबाह्य होणार आहेत. अशी अफवा गेले काही दिवस जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि विक्रेत्यांकडूनसुद्धा दहा रुपयांची नाणी नाकारली जातात. 

हा सर्व प्रकार सुरू असताना येथील स्टेट बॅंकेचे ग्राहक श्री. मिशाळ यांना आज वेगळाच प्रत्यय आला. त्यांनी आपल्या व्यवसायातील पैसे भरणा करण्यासाठी बॅंकेत आपला कर्मचारी पाठविला असता त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही दहाची नाणी घेणार नाही, असे सांगितले. या वेळी आमचे व्यवसायातील पैसे आहेत. त्यामुळे ते भरून घ्या, अन्यथा पैसे घेऊ शकत नाही असे लेखी कारण द्या, असे त्यांनी सांगितले; मात्र याबाबतचे लेखी कारण मागितल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याकडून योग्य ते उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत श्री. मिशाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

दहाची नाणी बंद होणार नाहीत. अफवेमुळे लोक बचत खात्यातही दहाची नाणी भरत आहेत. त्यामुळे रोजच्या कामावर ताण पडत आहे. करंट अकाऊंट असल्यास आम्ही नाणी नाकारत नाही. शक्‍यतो कॅशलेस व्यवहारांना आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे. करंट अकाऊंट असल्यास नाणी घेण्याची सूचना दिली आहे.
- नंदकिशोर भोसले, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बॅंक, सावंतवाडी.

Web Title: 10 rupees coin oppose accepting