वैद्यकीय महाविद्यालयासाठी सावंतवाडीतून दहा हजार पत्रे

वैद्यकीय महाविद्यालयासाठी सावंतवाडीतून दहा हजार पत्रे

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुर्ला व कुडाळ या चार तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीची तब्बल दहा हजार पत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती सिंधुदुर्ग यांच्याकडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आली. ही पत्र जिल्ह्यावासियांनी लिहीली असून यात बहुसंख्य महिलांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा प्रश्‍न गंभीर आहे. येथील जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने नजीकच्या गोवा राज्यावर नेहमीच अवलंबून राहावे लागत आहे. सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सुधारावी रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात याकरता येथील राजकीय पुढारी, सामाजिक संस्था आदींनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली होती; मात्र यात किंचितही सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. नजीकच्या गोवा मेडिकल कॉलेज मध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांना सुरू असलेल्या मोफत सुविधा बंद करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतल्याने येथील आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याबाबत सर्व स्तरातून शासनावर चौफेर टीका झाली होती.

गोवा मेडिकल काॅलेजमध्ये मोफत सुविधा कायम राहावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. उपोषणाचा मार्ग अवलंबिला; मात्र आजही तेथील सुविधेबाबत सिंधुदुर्गातील जनतेच्या मानेवर टांगती तलवार आहे. हे प्रश्‍न सुटण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा उपाय आहे.

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ले, कुडाळ याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व्हावे या मागणीसाठी कृती समिती स्थापन झाली व त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षात जनजागृती मोहिम हाती घेतली. याचाच भाग म्हणून दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्‍यातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याची मोहीम हाती घेतली होती. तालुक्‍यात ही मोहीम राबवताना कृती समितीने दहा हजार पेक्षा जास्त पत्रे आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पोस्टद्वारे पाठवली. ही पत्रे पोस्ट मास्तर सावंतवाडी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, शामराव सावंत, सीए लक्ष्मण नाईक, नगरसेवक परिमल नाईक, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, दिपाली भालेकर, सांगेली सरपंच मनस्वी राऊळ, अभय किनळोस्कर, हेलन निब्रे, पत्रकार दीपक गावकर, अनंत मेस्त्री, भगवान रेडकर, ऍन्ड्र्‌यू फर्नांडिस आदी उपस्थित होते.

वेंगुर्लेतून दहा हजार पत्रे पाठवणार
जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्य यंत्रणेवर केलेले काम लक्षात घेता आमच्या मागणीचा ते नक्कीच विचार करतील. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वेंगुर्लेतूनही दहा हजार पत्रे लवकरच मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे सांगेली सरपंच मनस्वी राऊळ यांनी यावेळी बोलताना सांगितले. दोडामार्गमधून याआधीच पत्रे पाठविण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com