नरडवे धरणासाठी १०८५ कोटी

नरडवे धरणासाठी १०८५ कोटी

कणकवली - गेली पंधरा वर्षे रखडलेल्या नरडवे धरण प्रकल्पाला आता चालना मिळणार आहे. या धरण प्रकल्पासाठी १०८५ कोटींच्या सुधारित खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, त्याबाबतचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. डिसेंबर २०१९ पर्यंत नरडवे धरण पूर्ण करण्याचे नियोजन शासनाने केले आहे.

कणकवली, कुडाळ आणि मालवण तालुक्‍याला सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याची क्षमता असलेल्या नरडवे धरण प्रकल्पाच्या कामाला २० वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली. सद्यःस्थितीत धरणाचे ७५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे, मात्र निधीची वाणवा, वनसंज्ञा, पर्यावरण दाखला आणि गावठाण मोबदला वाटप यामुळे गेली पंधरा वर्षे या धरणाचे काम ठप्प आहे.

राज्य शासनाने नरडवे मध्यम प्रकल्पाला २०१६-१७ च्या दरसूचीवर आधारित १०८४.६६ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे या धरण प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या धरण प्रकल्पामुळे  कणकवली आणि कुडाळ तालुक्‍यांतील ३८ गावे ओलिताखाली येणार आहेत.

तालुक्‍यातील नरडवे प्रकल्पाचे भूमिपूजन जून १९९८ मध्ये झाले, तर प्रत्यक्ष कामाची सुरवात फेब्रुवारी २००१ मध्ये झाली. त्यावेळी हा प्रकल्प ३२ कोटी ४३ लाख अंदाजित खर्चाचा होता. त्यानंतर विविध कारणांमुळे रेंगाळलेल्या या प्रकल्पाची किंमत आता १०३८ कोटींवर पोचली आहे. यातील मुख्य निधीचा अडसर आता दूर झाला असला तरी वनसंज्ञा, पर्यावरण दाखला आणि पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे असणार आहे.

असा आहे प्रकल्प

  •  गडनदीवर १२३.७४ दलघमी क्षमतेचे धरण 
  •  कणकवली तालुक्‍यातील ५११९ हेक्‍टर, कुडाळ तालुक्‍यातील ९०९ हेक्‍टर आणि मालवण तालुक्‍यातील १९८४ हेक्‍टर अशा एकूण ८०८४ हेक्‍टर क्षेत्रास या प्रकल्पाद्वारे सिंचनाचा लाभ होणार
  •  प्रकल्पाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ११९.१६ दलघमी असून,
  •    एकूण पाणीवापर ९२.०२५ दलघमी इतका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com