पाली ग्रामपंचायतीत सर्वपक्षियांच्या बहिष्कारामुळे 11 उमेदवार बिनविरोध 

pali
pali

पाली ( रायगड)  : पाली ग्रामपंचायतीवर तब्बल अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी (ता.26) पाली ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. शनिवारी (ता.15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. यावेळी सर्व पक्षीय उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे न घेतल्याने अकरा अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले.

पाली नगरपंचायत व्हावी व गावाच्या विकासाठी सर्व पक्षीयांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मात्र अपक्ष उमेदवारांनी नगरपंचायत होण्याच्या किचकट व वेळखाऊ प्रक्रियेला कंटाळून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकास करण्याच्या हेतुने पाली ग्रामपंचायत निवडणुक लढविण्याचा निर्धार केला.

शनिवारी (ता.15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 3 वाजेपर्यंत मुदत होती. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सर्वपक्षियांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र अपक्ष उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुक लढविण्याची शेवटपर्यंत ठाम भुमिका ठेवली. अखेर पाली ग्रामपंचायतीसाठी 11 अपक्ष उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. तर सरपंचपदासाठी अनुसुचित जमातीकरीता आरक्षण जाहीर झाले असून सरपंचपदासाठी प्रभाग क्र. 2 मध्ये लढत होणार आहे. याबरोबरच प्रभाग क्र. 5 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी मतदान पार पडणार आहे. 

या निवडणुक प्रक्रियेचे कामकाज पाली सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी एम. के. जाधव व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी रमाकांत शिंदे यांनी पाहिले. पालीच्या इतिहासात पाली ग्रामपंचायतींवर पहिल्यांदाच अपक्षांची सत्ता आली आहे. निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांनी पालीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व आनंदोत्सोव साजरा केला. 

 पाली ग्रामपंचायतीच्या 17 जागांच्या निवडणुकीसाठी एकूण 43 उमेदवारांचे सदस्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर 4 उमेदवारांचे सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रभाग क्र. 1 मधून 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. तर अपक्ष उमेदवार नरेश गोविंद शिंदे, गायत्री गणेश सावंत व गणेश सातांबेकर हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रं. 2 मधून 4 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रभाग क्रं. 2 मधून अपक्ष उमेदवार जुईली श्रिकांत ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रं. 2 मध्ये सरपंचपदासाठी ओमकार जाधव व गणेश बालके यांच्यात निवडणुक होणार आहे.  प्रभाग क्र. 3 मधून 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 6 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. तर अपक्ष उमेदवार अमित वसंत निंबाळकर, हिमाली सतिष शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रभागात ना.मा.प्र स्त्री ही जागा रिक्त राहिली. प्रभाग क्र. 4 मधून 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 6 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. तर अपक्ष उमेदवार भास्कर दुर्गे व शितल पटेल हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र. 5 मधून 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. प्रभाग क्र. 5 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी मतदान होणार आहे. बल्लाळ पुराणिक व विजय मराठे यांच्यात निवडणुक होणार आहे. तर अपक्ष उमेदवार सर्वसाधारण स्त्री आशा मुळे व ना.मा.प्र. अजय मुळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्र. 6 मधून 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. अपक्ष उमेदवार सर्वसाधारण स्त्री मयुरी मिलिंद गोळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या प्रभागात ना.मा.प्र स्त्री जागा रिक्त आहे. तसेच अनुसुचित जातीची जागा रिक्त आहे. 


उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कैलास बावधाने यांच्या उपस्थितीत येत्या 3 महिन्याच्या कालावधीत पाली नगरपंचायत होणे कामी प्रशासनाने आवश्यक ते प्रस्ताव व प्रक्रीया पुर्ण करावी असे आदेश दिल्याने पाली ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती काळ टिकेल व पाली नगरपंचायतीचा कारभार केव्हा सुरु होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

''मागील अनेक महिन्यांपासून पाली ग्रामपंचायत राहणार की नगरपंचायत होणार हा तिढा सूटलेला नाही. त्यामुळेच आम्ही तरुणांनी मिळून ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचयतीचा कारभार करण्याची संधी व अवधी मिळाल्यास लोकविकासाची कामे करू. पाली नगरपंचायत जाहिर झाल्यास आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू.''
- नरेश गोविंद शिंदे, विजयी अपक्ष उमेदवार, पाली ग्रामपंचायत. 

\

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com