रात्रीच्या वेळेस धावले "देवदूत' 

रात्रीच्या वेळेस धावले "देवदूत' 

खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्री 12.30 वाजता मुंबईकडे येणारी कार दोन मार्गिकांमधील 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. यात सहा जण गंभीर जखमी झाले. या सर्वांची तसेच पहाटे 4 वाजता जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक-कारच्या अपघातातील पाच जखमींची सुटका करण्यासाठी "अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या ग्रुपचे सदस्य देवदूतासारखे तातडीने धाऊन गेले. 

द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणारी कार खालापूर तालुक्‍यातील माडपजवळ आली असता, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. ही कार कठडा तोडून दोन मार्गिकांमधील खड्ड्यात कोसळली. तिचा पूर्णपणे चेंदामेंदा होऊन कारमधील सहा जण जखमी अवस्थेत अडकून पडले. अपघाताची माहिती गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी आरआयबी डेल्टा फोर्स, आयआरबी देवदूत टीम व खोपोलीतील "अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय' या ग्रुपच्या सदस्यांना दिली. त्यानंतर लगोलग या ग्रुपचे विजय भोसले, गुरुनाथ साठेलकर व इतर सहकारी एकमेकांशी समन्वय साधून अपघात ठिकाणी पोहचले. रात्रीची वेळ. त्यात 30 फूट खोल खड्डा, अशा अवघड स्थितीत या सर्वांनी गंभीर जखमींना योग्य काळजी घेत अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढत तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. यात भोसले यांनी अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली. 

पहाटे 3 पर्यंत ही कामगिरी ओटोपल्यावर पहाटे 4 वाजता खोपोली-शिळ फाटा येथील अपघाताची खबर या ग्रुपला मिळाली. यात गुरव समाजाच्या मोर्चासाठी निघालेल्या सुमोला ट्रकने मागून जोरदार धडक दिली होती. यात जखमी झालेल्या पाचही जणांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. यात धर्मेंद्र रावळ, विनीत मोडक, प्रवीण जाधव, गुरुनाथ साठेलकर यांनी महत्त्वाची मदत केली. गुरव समाजाचे अध्यक्ष व खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांनी रुग्णालयात जाऊन मदतीसाठी पुढाकार घेतला. दोन्ही अपघातांतील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. 

आवाहन... 
मुंबई-पुणे प्रवासादरम्यान पनवेल ते खंडाळादरम्यान कोणत्याही ठिकाणी अपघात घडल्यास वाहतूक अगर स्थानिक पोलिस, आयआरबी डेल्टा फोर्ससोबत "अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या ग्रुपशी पुढील क्रमांकांवर जरूर संपर्क साधावा. गुरुनाथ साठेलकर-7774812222, विजय भोसले-9850113131, शेखर जांबळे-997549470?????, बाबू पुजारी-9326661718, धर्मेंद्र रावळ-9823703155. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com