जयगड-मुंबई बस बाहेर काढण्यात अपयश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

अडकली खोलवर खडकात; मृतदेह असल्याचा अंदाज
रत्नागिरी - महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या बसपैकी दुसरी जयगड-मुंबई बसही नौदलाच्या पाणबुड्यांनी आज शोधून काढली. शोधमोहिमेचा आजचा दहावा दिवस होता. या बसमध्ये मृतदेह असण्याची शक्‍यता नौदलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. मात्र, बस बाहेर काढण्याचे प्रयत्न आज असफल झाले.

अडकली खोलवर खडकात; मृतदेह असल्याचा अंदाज
रत्नागिरी - महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या बसपैकी दुसरी जयगड-मुंबई बसही नौदलाच्या पाणबुड्यांनी आज शोधून काढली. शोधमोहिमेचा आजचा दहावा दिवस होता. या बसमध्ये मृतदेह असण्याची शक्‍यता नौदलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. मात्र, बस बाहेर काढण्याचे प्रयत्न आज असफल झाले.

राजापूर-बोरिवली बस दुर्घटनाग्रस्त पुलापासून चारशे मीटरवर सापडली. तेथे नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. पंधरा फुटांहून अधिक खोलवर हे अवशेष रुतलेले आढळले. नौदलाच्या पाणबुड्यांनी केलेल्या या कामगिरीनंतर बसचे अवशेष पात्राबाहेर काढता येतील, असा अंदाज असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) चमूला त्याची माहिती देण्यात आली. बस पाण्यात उलटी झाल्याने बाहेर काढण्यात प्रशासनाला सायंकाळपर्यंत यश आले नाही. नदीच्या मध्यावर आणि खडकामध्ये बस अडकली आहे. प्रथम सावित्री नदीच्या राजेवाडी बाजूच्या तीरावरून बस काढण्याचे प्रयत्न सुरू होते; परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे महाड बाजूकडून दुसऱ्या किनाऱ्यावरून हे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शोध पथकाला आज दुसरी बस आढळल्यानंतर दोन क्रेन, जेसीबी मागवण्यात आले. क्रेन आणि हायड्रा तेथपर्यंत नेण्यासाठी तात्पुरता रस्ताही तयार करण्यात आला. यात दुपारचे तीन वाजून गेले. बसपासूनचे अंतर अधिक आणि बस खडकात अडकल्याने दोन वेळा रोप तुटला. बस खेचण्यासाठी ताकद कमी पडली. त्यामुळे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अंतर कमी असल्याने बस बाहेर काढता येईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्‍त केला. जयगड-मुंबई ही दुसरी बस सापडल्यानंतर तीमध्ये मृतदेह सापडतील, अशी खात्री प्रशासनाला वाटते आहे. त्यामुळे मृतदेहांचे पंचनामे, शवविच्छेदनासाठीची तयारी करण्यात आली आहे. चार ऑगस्टपासून नौदलाच्या पाणबुड्यांची मोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप खासगी वाहनांपैकी काहीही हाती लागलेले नाही. "एनडीआरएफ‘च्या पाचव्या बटालियनच्या कमांडरने सांगितले, की जोपर्यंत वरून आदेश मिळत नाही तोपर्यंत शोधाचे काम सुरूच राहील. आतापर्यंत 26 मृतदेह हाती लागले असून, 14 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध लागण्याची आशा मावळल्याने त्यांचे नातेवाईक महाडमधून घरी परतले आहेत. 26 लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद महाड पोलिसांनी केली आहे.