ग्रामीण भागात १२५ कोटींची कामे सुरू - रवींद्र वायकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

रत्नागिरी - प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये १२५ कोटींची ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे चालू आहेत. येत्या काळात ग्रामीण रस्त्यांचे काम पूर्ण होणार आहे. साकव दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे, असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर श्री. वायकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर उपस्थित होते.

श्री. वायकर म्हणाले की, जिल्ह्यात जिथे जिथे संधी आहे तेथे पर्यटनाच्या दृष्टीने तिथे विकास व्हावा, यासाठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवामुळे पर्यटकांच्या संख्येत निश्‍चित येत्या काळात वाढ होणार आहे. समुद्रकिनारा सुरक्षेसाठी व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवल्याबद्दल पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवा, दरोडेखोर, गुन्हेगारांचा छडा लावून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, सलग १५ वर्षे उत्तम सेवा, प्रशंसनीय कार्य, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उंच करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धाडसी कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मागेल त्याला बोअरवेल
ग्रामीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. २ कोटींची बोअरवेलची योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला बोअरवेल’ पुरविण्यात येणार आहे. ज्यांना बोअरवेलऐवजी विहिरी हव्या आहेत, त्यासुद्धा त्यांना देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे वायकर यांनी सांगितले.

Web Title: 125 crore work start in rural area