कोकणातील तीन जिल्ह्यातून 1389 जण हज यात्रेस

मुझफ्फर खान
शुक्रवार, 3 मे 2019

एक नजर

  • सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतील 1 हजार 389 जणांना हज यात्रा करण्याची संधी
  • मुंबईतील हज कमिटीच्या कार्यालयातून माहिती
  • हज समितीचा कोटा तब्बल 14 हजार 975
  • अतिरिक्त सीटमध्ये सर्वाधिक 2387 सीट महाराष्ट्राच्या वाट्याला

चिपळूण - सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतील 1 हजार 389 जणांना हज यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील हज कमिटीच्या कार्यालयातून याबाबतची माहिती देण्यात आली. 

हज समितीचा कोटा तब्बल 14 हजार 975 जागा वाढविण्यात आला आहे. अतिरिक्त सीटमध्ये सर्वाधिक 2387 सीट महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील आणखी काहीजणांना हज करण्याची संधी मिळणार आहे. सौदी अरेबिया सरकारशी झालेल्या करारानुसार सौदी दूतावासाकडून ही वाढ करण्यात आली आहे.

वाढलेल्या जागामुळे यावर्षी हज कमिटी मार्फत 1 लाख 40 हजार यात्रेकरूंना हजला जाता येणार आहे. इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी हज यात्रा ही एक असून दरवर्षी सौदी अरेबियांत भरत असते. त्यासाठी जगभरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होतात.

भारतातील यात्रेकरूंसाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून नियोजन करण्यात येते. भारतासाठी सरासरी 1 लाख 60 हजार यात्रेकरूंना पाठविले जाते. त्यामध्ये जवळपास 50 हजार सीट खासगी टुर्स कंपनीला दिल्या असून उर्वरित यात्रेकरूंच्या यात्रेचे नियोजन हज कमिटी ऑफ इंडियामार्फत केले जाते.

यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी हज कमिटीसाठी सुरवातीला 1 लाख 25 हजार जागांची देशभरातील विविध राज्यातून आलेल्या अर्जातून संगणकीय सोडत काढून निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याशिवाय हज कमिटीने आणखी कोटा वाढवून देण्याबाबत मंत्रालयामार्फत जानेवारीमध्ये मागणी केली होती. 

कोटा वाढवून दिला

सौदी अरेबियाच्या जेदाद्द दूतावासाने 18 एप्रिलला 14 हजार 975 अतिरिक्त कोटा वाढवून दिला आहे. अतिरिक्त कोट्याचे विविध 14 राज्यातील इच्छुकांच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांना सर्वाधिक 2387 जागा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रतीक्षा यादीवर असलेल्या 721 ते 3104 क्रमांकावर असलेल्यांना यात्रेकरूना हजला जाण्याची संधी मिळणार आहे. संबंधितांनी पासपोर्टसह वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता 9 मेपर्यत केल्यानंतर त्यांचा हज प्रवास निश्‍चित होईल.

सौदी दूतावासाशी झालेल्या पत्रव्यवहारानुसार हज कमिटीला 14,975 अतिरिक्त कोटा मिळाला आहे. त्याचे राज्यनिहाय प्रतीक्षा यादीवरील इच्छुकांना संधी देण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्यांनी वेळेत कागदपत्रे व रकमेची पूर्तता केल्यानंतर त्यांचा प्रवास निश्‍चित समजला जाईल.

- डॉ. एम. ए. खान (मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया)

जिल्ह्यानिहाय हजला जाणारे यात्रेकरू

  • सिंधुदुर्ग - 238
  • रत्नागिरी - 412 
  • रायगड - 739 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1389 devotee on Hajj tour from Konkan three districts