वेंगुर्लेत विकासासाठी 14 कोटींच्या कामांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

येथील पालिकेला 2016- 17 मध्ये सुमारे 14 कोटींच्या नवीन विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही कामे लवकरच चालू करण्यात येतील अशी माहिती नगराध्यक्ष राजन गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वेंगुर्ले - येथील पालिकेला 2016- 17 मध्ये सुमारे 14 कोटींच्या नवीन विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही कामे लवकरच चालू करण्यात येतील अशी माहिती नगराध्यक्ष राजन गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालिकेच्या विविध मंजूर झालेल्या विकास कामांबद्दल माहिती देण्यासाठी काल (ता. 5) नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक विधाता सावंत, प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, संदेश निकम, आत्माराम सोकटे, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, सुमन निकम, श्रेया मयेकर आदी उपस्थित होते.

या नवीन कामात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) अंतर्गत 2 कोटी 58 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात महाजनवाडी येथे शौचालय बंधणे, नंदोस्करवाडी येथे 2 सीट संडासाचे बांधकाम करणे, राजवाडा येथील वहाळी दुरुस्ती व उतारीकरण, नाडकर्णी चाळीजवळील वहाळीचे बांधकाम, दाभोसवाडा ख्रिश्‍चनवाडी वाहळीचे बांधकाम, धोंडी राऊळ दुकानापासून राममंदिर पर्यंत गटार बांधकाम, दाभोसवडा गटार बांधकाम, हॉस्पिटल नाका सार्वजनिक मुतारीचे बांधकाम, प्रसन्नकुमार करंगुटकर ते दिलीप वेळकर घरापर्यंत गटाराचे बांधकाम, धावडेश्वर स्मशानभूमी सुशोभीकरण, कोरगावकर घराजवळील गटाराचे बांधकाम, विलास नेवरेकर घराजवळील गटाराचे बांधकाम, भोसलेवाडी रस्ता सिमेंटिकरण, मानसी गार्डनचे विकसन, भाळी मार्केट इमारतीचे बांधकाम भाग 2, नारायण तलाव जुन्या विहिरीची खोली वाढवून पंप बसविणे आदी कामांचा समावेश आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 7 कोटी 65 लाख 90 हजार 288 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यात घोडेबाव गार्डन विकास, खर्डेकर कॉलेज शेजारील कॉर्नरच्या मोरीवर रिक्षा स्टॅंड पार्किंगची सोय, नगरपरिषद मल्टिपर्पज हॉल व शॉपिंग सेंटरचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. विशेष रास्ता अनुदान अंतर्गत 2 कोटी 87 लाख 31 हजार 687 रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात दाडाचे टेंम्ब ते नवीन म्हाडा वसाहत रास्ता डांबरीकरण करणे व मोऱ्यांचे बांधकाम, श्रद्धा कॉम्पेक्‍स रास्ता खडीकरण डांबरीकरण, आडी पूल ते कॅम्प भटवाडी रास्ता डांबरीकरण आदी कामांचा समावेश आहे.

दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 47 लाख 38 हजार 573 रुपयांच्या प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे.याशिवाय येथील पालिकेने दलित वस्ती सुधारणा योजना, रास्ता अनुदान, अल्प संख्यांक बहुल योजना, प्रोत्साहन अनुदान अशा वेगवेगळ्या योजनेतून निधीसाठी प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती नगराध्यक्ष गिरप यांनी दिली. कामे मंजूर होण्यास मदत केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या सर्वांचे आभार मानले.

Web Title: 14 crore sanctioned for development work