14 विदेशी पर्यटकांना पुन्हा गोव्यात पाठविले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गोवा सीमेवर इन्सुली व पत्रादेवी येथे वैद्यकीय पथके तैनात केली आहेत.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या 14 विदेशी पर्यटकांना इन्सुली व पत्रादेवी येथील तपासणी नाक्‍यावरून पुन्हा गोव्यात पाठविण्यात आले. आज दिवसभरात जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून आलेल्या 60 जणांची पथकाकडून तपासणी करण्यात आली. 

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गोवा सीमेवर इन्सुली व पत्रादेवी येथे वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. गोव्यातून येणाऱ्या विदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

इन्सुली तपासणी नाक्‍यावर रशियन पर्यटक जोडपे इशारा करूनही न थांबल्याने पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची तपासणी केली. इन्सुली नाक्‍यावर दिवसभरात पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील 39 पर्यटकांची तपासणी केली. गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या 12 विदेशी पर्यटकांची तपासणी करून त्यांना गोव्यात माघारी पाठविण्यात आले. पत्रादेवी तपासणी नाक्‍यावर 26 पर्यटकांची तपासणी करण्यात आली. याठिकाणी दोन विदेशी पर्यटकांना तपासणी करून गोव्यात पाठविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 Foreign Tourists Sent Back To Goa Due To Corona