एैसपैस खड्ड्यांना धुळीची साथ

राजेश सरकारे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला. पावसाचा जोर लक्षात घेऊन फेवर ब्लॉकचा वापर केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. रस्ते पुन्हा खड्डेमय झाले. त्यामुळे केवळ खड्डे बुजवून चालणार नाही. मोठ्या प्रमाणात खड्डे असलेली ठिकाणे निवडून तेथे पुन्हा डांबरीकरण करावे लागणार आहे.
- उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

महामार्गावरील खड्डे पुराण सुरूच; दुरुस्तीच नसल्याने वाहनचालक हैराण; सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनावर आगपाखड; सामान्यांची पोटतिडीक ऐकणार का?

मुंबई-गोवा महामार्गाची सिंधुदुर्गात दैना झाली आहे. भरीत भर म्हणून महामार्ग आता धुळीने माखला आहे. यामुळे वाहन हाकणे प्रचंड त्रासदायक बनले आहे. पावसाळा संपला तरी खड्डे बुजविण्यासाठी पुरेसा निधीच आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे. दुरुस्तीची मागणी राजकीय नेत्यांबरोबरच सर्वसामान्यांकडून पोटतिडकीने होत आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही याला अधिकारी आणि ठेकेदारांना जबाबदार धरत आगपाखड सुरू आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती नेमकी कुठे अडकली हे शोधण्याचा हा प्रयत्न...

बिकट वाट
यंदाच्या उच्चांकी पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली. तीन ते चार वेळा खड्डे बुजवूनही महामार्गाची दुरवस्था कायम राहिली. आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा कोल्ड मिक्‍स डांबरीकरणाने पॅचवर्क केले जात आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग नव्याने डांबरीकरण करण्याबाबत शासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. जिल्ह्यातील वागदे ते ओरोस या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे; परंतु हा निधी अद्यापही महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आलेला नाही. वस्तूत: खारेपाटण ते झाराप महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 16 कोटींचा निधी आवश्‍यक आहे. तसा प्रस्तावही महामार्ग विभागाकडे केंद्राकडे पाठविला आहे; परंतु महामार्ग चौपदरीकरणाची निवाडा प्रक्रिया सुरू होताच खारेपाटण ते कणकवली आणि वागदे ते झाराप हा टप्पा दोन खासगी कंपन्यांकडे वर्ग केला जाणार आहे. या कंपन्यांकडेच या दोन टप्प्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण होईपर्यंत महामार्गाची वाट बिकटच राहणार आहे.

धुळीच्या माऱ्याने दुचाकीस्वार काळवंडले
पावसाळ्यात प्रचंड खड्डेमय झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी यंदा नानाविध प्रयत्न करण्यात आले. सुरवातीला जांभा दगड आणि मुरूम टाकण्यात आला. अतिपाऊस असल्याने सिमेंटचा वापर झाला. अनेक भागांत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. या अनेकविध प्रयत्नांनंतर हा मार्ग सध्या वाळू, खडी, माती यांचे मिश्रण असलेल्या धुळीचा झालेला आहे. अवजड वाहने गेल्यानंतर त्या पाठोपाठ प्रचंड धूळ निर्माण होते. त्या प्रदूषणाचा त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे.

बॅलन्स बिघडला
महामार्गावर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, काही भागांत क्रॉंक्रिटीकरण तर काही भाग खडीने बुजविण्यात आला. यात महामार्गाचा समतोलपणा कुठेच राहिलेला नाही. दुचाकी, चार चाकी वाहने अनेक ठिकाणी हेलकावे खात आहेत. अनेक भागातील खड्डे तसेच राहिल्याने वाहने जोरदारपणे आदळत आहेत. यात सातत्याने अपघातदेखील होत आहेत.

कणकवली-खारेपाटणची दैना
कणकवली ते खारेपाटण हा मार्ग पावसाळ्यात सुस्थितीत होता; आता मात्र अनेक भागांतील डांबरीकरण उखडत चालले आहे. या टप्प्याचा लायबिलिटी कालावधी एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे मेपूर्वी कणकवली ते खारेपाटण या टप्प्याचेही डांबरीकरण होणे अत्यावश्‍यक ठरणार आहे. यात दिरंगाई झाल्यास हा टप्पाही पुढील पावसाळ्यात खड्डेमय होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पॅचवर्क नको
मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी लवकरच 42 लाखांचा निधी उपलब्ध आहे. मात्र निधी मंजूर होण्याआधीच वागदे ते ओरोस या टप्प्याची दुरुस्ती केली जात आहे. यानंतर 82 लाखांचा निधी मंजूर झाला तर ओरोस ते झाराप हा टप्प्याची दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे; मात्र यंदा खड्डेमय महामार्गामुळे झालेली भीषणता पाहता, महामार्गाचे पॅचवर्क नको तर डांबरीकरण होणेच आवश्‍यक झाले आहे. त्यासाठी सर्वसामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करणे आवश्‍यक झाले आहे.

सक्षम ठेकेदाराची गरज
सिंधुदुर्गातील खारेपाटण ते कणकवली आणि वागदे ते झाराप या टप्प्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांकडे चौपदरीकरणाचा ठेका दिला जाणार आहे. मात्र, या कंपन्या या कामासाठी सक्षम असल्या तर तीन ते चार वर्षांत चौपदरीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. यापूर्वी पनवेल ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा टप्पा 2012 मध्ये दोन कंपन्यांना चौपदरीकरणासाठी देण्यात आला; मात्र या दोन्ही कंपन्यांची आर्थिक सक्षमता नसल्याने पाच वर्षे झाली तरी या टप्प्याचे काम पूर्ण झालेले नाही. तशीच परिस्थिती सिंधुदुर्गात निर्माण होऊ नये यासाठी सक्षम ठेकेदार असणे आवश्‍यक आहे.

मुंबई महामार्गाच्या डांबरीकरणासाठी अद्याप कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही. खड्डे बुजविण्यासाठी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र त्याचीही उपलब्धता झालेली नाही.
- ए. पी. आवटी, कार्यकारी उपअभियंता, महामार्ग प्राधिकरण

सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्डे 25 नोव्हेंबरपर्यंत बुजवायचे आहेत. यानंतर मी 26 नोव्हेंबरला महामार्ग व राज्यमार्गांची पाहणी करणार आहे. या वेळी खड्डे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. खड्डे बुजविण्यासाठी 42 लाखांचा निधी मंजूर आहे. आणखी 80 लाखाची मंजुरी मिळविण्यात येईल.
- आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम

महामार्गावरील झाराप ते खारेपाटण या पट्ट्याचे नूतनीकरण करण्यासाठी 10 कोटींच्या निधीची मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. लवकरच गडकरी यांची यासंदर्भात भेट घेणार आहे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला. पावसाचा जोर लक्षात घेऊन फेवर ब्लॉकचा वापर केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. रस्ते पुन्हा खड्डेमय झाले. त्यामुळे केवळ खड्डे बुजवून चालणार नाही. मोठ्या प्रमाणात खड्डे असलेली ठिकाणे निवडून तेथे पुन्हा डांबरीकरण करावे लागणार आहे.
- उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग