लांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे उपचारासाठी नेत असताना पाली येथे वाटेतच मृत्यू झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास लांजा शहरात रखांगी प्लाझा या इमारतीसमोर झाला.

लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे उपचारासाठी नेत असताना पाली येथे वाटेतच मृत्यू झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास लांजा शहरात रखांगी प्लाझा या इमारतीसमोर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा शहरातील मुबारक कासम सारंग हा गेल्या सात वर्षांपासून लांजा शहर व राजापूर तालुक्यात दुध वितरणाचा व्यवसाय करतो. शुक्रवारी रात्री सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील अशोक उफ राजाभाऊ जगन्नाथ मोहिते (वय 52) हे टाटा 909 या टेम्पोतून (एमएच-08-झेड-3575) दूध घेवून लांजा येथे आले होते. लांजा बाजारपेठेत रखांगी कॉम्लेक्स या इमारतीलगत टेम्पो उभा करण्यात आला होता. त्यानंतर मुबारक सारंग हा आपला अ‍ॅपे टेम्पो (एमएच-08-के-6532) घेवून त्याठिकाणी दाखल झाला. यानंतर महामार्गालगत दोन्ही गाड्या उभ्या करून टाटा 909 टेम्पोतील दुधाचे क्रेट अ‍ॅपे टेम्पोमध्ये भरण्याचे काम सुरू होते. याचवेळी रात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगाने गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या खासगी आरामबसने (जीए-02-एमआर-328) अ‍ॅपे टेम्पोला जोरधार धडक दिली. ही बस शेख बशीर अहमद (55, रा. डिचोली गोवा) हा चालवित होता. बसची धडक इतकी भीषण होती की धडकेत अ‍ॅपेटेम्पोचा चुराडा झाला.

टेम्पोतून दुधाचे क्रेट उतरवून घेणारा मुबारक सारंग यांच्या शरीराच्या खालील भागाच्या चिंधड्या झाल्या. टेम्पोचालक अशोक मोहिते गंभीर जखमी झाले होते. त्याही परिस्थितीत त्यांनी भ्रमणध्वनीवरून अपघात झाला असून आपल्याला उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र रत्नागिरी येथे नेण्यात येत असताना अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा पाली येथे मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच गस्त घालणार्‍या उपनिरीक्षक रेखा जाधव यांच्यासह सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बळवंत शिंदे, सुरेश शिरगावकर, हेडकॉन्स्टेबल प्रकाश चवेकर, राजेंद्र वळवी, चालक राजेंद्र देसाई घटनास्थळी दाखल झाले. अपघाताप्रकरणी पोलिसांनी आरामबसचालक शेख अहमद याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पुतण्याचा वाढदिवस साजरा करायचा राहिला
लांजा शहरात राहणारा मुबारक कासम सारंग हा गेल्या सात वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करतो. वाळवा येथून येणारे दूध लांजा येथे उतरून घेतल्यानंतर आपल्या अ‍ॅपे टेम्पोने तो दुधाचे राजापूर येथे वितरण करत होता. शुक्रवारी त्याच्या पुतण्याचा वाढदिवस होता. त्यामुळे कुटुंबीयांनी बाहेरच जेवणाचा बेत केला होता. त्यानुसार सर्वजण ठरल्याठिकाणी दाखल झाले होते. मात्र दुध घेवून आलेल्या अशोक मोहिते याने 12 वाजता आपण लांजात आल्याचे त्याला मोबाईलवरून सांगितल्यानंतर तो टेम्पोसह लांजात आला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला. 

जागा आणि वेळ बदलली अन् जीव गेला
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांसाठी हा दुर्देवी योगायोग म्हणावा लागेल. लांजात दुध घेवून येणारी गाडी ही दररोज 2.30 वाजता येते. मात्र शुक्रवारी रात्री हा दुधाचा टेम्पो दोन तास अगोदर म्हणजे 12 वाजताच लांज्यात दाखल झाला होता. नेहमी दुधाचा टेप्मो लांजात आल्यानंतर शहरातील शरीफ बेकरीसमोरील जागेत दुध खाली करण्यात येते. मात्र शुक्रवारी मुबारक सारंग याने जागा बदलली व दोन्ही वाहने रखांगी प्लाझासमोर लावण्यात आली. मात्र हा जागाबदल त्यांच्या जिवावर बेतला. याबाबतची चर्चा शहरात सुरू होती. 

Web Title: 2 died in arambus and tempo accident