माकडतापातील मृतांच्या कुटुंबास 2 लाख मिळणार  - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारे आरोप करणे सोपे असते; मात्र या काळात आपला जीव धोक्‍यात घालून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या सीमेवर माकडाचे मृतदेह पुरले ही माहिती चुकीची आहे. ते मृतदेह जाळण्यात आले होते. त्यामुळे चुकीची माहिती पसरविणे योग्य ठरणार नाही. 
- दीपक केसरकर, पालकमंत्री. 

सावंतवाडी - माकडतापाने बळी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला असून ही रक्कम अंदाजे दोन लाख इतकी असेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. 

साथीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असताना आमदार नीतेश राणे यांच्याकडून केवळ प्रसिद्धीसाठी होत असलेले आरोप दुर्दैवी आहेत. आरोप करण्यापेक्षा आपला जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक बळ देणे गरजेचे आहे, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. 

श्री. केसरकर यांनी आज निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, ""माकडतापावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नात आहे. त्यासाठी औषध फवारणी तसेच अन्य वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. कंट्रोल फायरिंगसारखा निर्णय घेणे गरजेचे होते; मात्र त्यासाठी वरिष्ठ वन विभागाच्या कार्यालयाची परवानगी आवश्‍यक असल्यामुळे तसा प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे. त्याला काही दिवस लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच अन्य उपाययोजना राबवून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. साथीने बळी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची मुख्य भूमिका खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यात आजारी रुग्णांचासुद्धा समावेश आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले प्रस्ताव शासनदरबारी तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानभरपाई किती द्यावी याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही ही भरपाई किमान दोन लाख असेल. कर्नाटक शिमोगा येथे जरी ही साथ असली तरी त्या ठिकाणी नुकसानभरपाई देण्याची कुठचीही पद्धत नाही; मात्र आमच्या शासनाकडून ही भरपाई मिळणार आहे.'' 

केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारे आरोप करणे सोपे असते; मात्र या काळात आपला जीव धोक्‍यात घालून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या सीमेवर माकडाचे मृतदेह पुरले ही माहिती चुकीची आहे. ते मृतदेह जाळण्यात आले होते. त्यामुळे चुकीची माहिती पसरविणे योग्य ठरणार नाही. 
- दीपक केसरकर, पालकमंत्री. 

Web Title: 2 lakh each to the family for Monkey Fever