
आता केवळ 21 शाळा सुरू होणे बाकी आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी 20 शाळा सुरू झाल्या आहेत. 27 जानेवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर 8 फेब्रुवारीपर्यंत 896 पैकी 875 शाळा सुरू झाल्या आहेत. 34 हजार 83 विद्यार्थ्यांपैकी 23 हजार 221 विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. आतापर्यंत कोरोना टेस्ट केलेल्या शिक्षकांतील 29 शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी बाधित आला आहे. आता केवळ 21 शाळा सुरू होणे बाकी आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
पालकांच्या संमतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा असून 30 रोजी 767 शाळा सुरु झाल्या होत्या. 3 फेब्रुवारीला आणखी 40 शाळा सुरु झाल्या. नव्याने 2 हजार 567 विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते. परिणामी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 21 हजार 921 झाली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांत आणखी 20 शाळा सुरू झाल्या आहेत. नव्याने 1 हजार 300 विद्यार्थी दाखल झाले आहेत.
कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल 11 महिन्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करुन आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्यात येत आहेत. प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. पैकी 875 शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमधून 34 हजार 83 विद्यार्थी असून यापैकी 23,221 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3047 शिक्षक असून 3 हजार 18 शिक्षकांची आरटीपीसीआर केली आहे. यापैकी 29 शिक्षकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय 783 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 776 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केली असून यापैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
21 शाळा अजूनही बंद
दोडामार्ग तालुक्यात 59 पैकी 59, सावंतवाडीत 161 पैकी 161, वैभववाडी 56 पैकी 56, मालवण 133 पैकी 133 शाळा सुरु झाल्या आहेत. देवगड 118 पैकी 117 शाळा सुरु आहेत. वेंगुर्ले 83 पैकी 82, कुडाळ 130 पैकी 120. कुडाळातील 156 पैकी 147 शाळा सुरु आहेत. 896 पैकी 855 शाळा सुरु आहेत. अजुन 21 शाळा सुरु नाहीत. एकंदरीत सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी व मालवण तालुक्यातील 100 टक्के शाळा सुरू झाल्या असून उर्वरित चार तालुक्यांत 100 टक्के शाळा सुरु नाहीत. त्यात कणकवलीत सर्वाधिक 10 शाळा सुरु झालेल्या नाहीत.
संपादन - राहुल पाटील