जव्हारमध्ये रस्ता तुटल्याने 35 गावांचा संपर्क तुटला

भगवान खैरनार
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

-  जव्हारमध्ये गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हनुमान पॉईंट पर्यटनस्थळाच्या खाली चोथ्याचीवाडी जवळ रविवारी (ता. ४) रात्री संपूर्ण रस्ता तुटला.

- तेव्हापासून या भागातील जवळपास  35  गावंपाड्यांचा संपर्क तुटला आहे.

मोखाडा : जव्हारमध्ये गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हनुमान पॉईंट पर्यटनस्थळाच्या खाली चोथ्याचीवाडी जवळ रविवारी (ता. ४) रात्री संपूर्ण रस्ता तुटला. तेव्हापासून या भागातील जवळपास  35  गावंपाड्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थी, रूग्ण, आणि नागरिकांचे हाल होत आहेत. सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार होत आहे. 

जव्हार शहरापासून 2  कि.मी. अंतरावर चोथ्याच्यावाडी गावाजवळ नागमोडी वळणावर संपूर्ण रस्ता मुसळधार पावसाने तुटला आहे. त्या परिसरातील नागरिकांना नाशिककडे जाणाऱ्या रस्त्याने आपटाळे, केळीचापाडा असा फेरफटका मारून यावे लागते आहे. त्यामुळे या तुटलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार  चोथ्याच्यावाडी जवळ संपूर्ण रस्ता तुटल्याने झाप, साकुरकडे जानारे दोन्ही रोड बंद झाले आहेत. तसेच साकुर येथे इयत्ता 1ली ते 12 वी पर्यंत मुलींची आश्रमशाळा आहे. तसेच आदिवासी विकास विभागाने  गेल्या जून महिन्यापासून आश्रम शाळांना रोजच सकाळी जेवण, दुपारी नास्ता, आणि संध्याकाळी जेवण असे सेंट्रलाईज किचन योजनेंतर्गत जेवणाचे डबे सुरु केले आहेत. मात्र साकुर आश्रम शाळेकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. डब्बे उशिराने येत असल्याने विद्यार्थ्यांना जेवण उशिरा मिळत आहे. आता या आश्रम शाळेतील मुलांना नास्ता, जेवण हे आपटाळे केळीचापाडा मार्गे
असा फेरफटका मारून जेवणाचे डब्बे आश्रम शाळेत पोहचवावे लागत आहेत. 

रुग्णांना अडचण
तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी त्या भागातील रुग्णांसाठी साकुर येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र त्या ठिकाणच्या काही रुग्णांना जव्हारच्या कुटीर रुग्णालयात पोहचविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर गंभीर रूग्णांच्या जिवावर बेतण्याची भिती निर्माण झाली आहे. 

"रस्त्याचे काम सुरू केले आहे, लवकरच हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येईल."

- डी. डी. पाटील, शाखा अभियंता, सा. बा. उप विभाग जव्हार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

टॅग्स