पाणीपट्टी न भरणार्‍या 25 कुटुंबाचे पाणी तोडले

नागेश पाटील
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

चिपळूण - तालुक्यातील मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना समितीने पाणीपट्टी वसुलीसाठी आज कडक कारवाईस सुरवात केली. मांडकी बु. येथे दोन-तीन वर्षे पाणीपट्टी न भरणार्‍या कुटुंबांची आज नळपाणी पुरवठा जोडणी तोडली. गावात कारवाईचे सत्र सुरू झाल्याने काहींनी पाणीपट्टी जमा करण्यास सुरवात केली.

चिपळूण - तालुक्यातील मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना समितीने पाणीपट्टी वसुलीसाठी आज कडक कारवाईस सुरवात केली. मांडकी बु. येथे दोन-तीन वर्षे पाणीपट्टी न भरणार्‍या कुटुंबांची आज नळपाणी पुरवठा जोडणी तोडली. गावात कारवाईचे सत्र सुरू झाल्याने काहींनी पाणीपट्टी जमा करण्यास सुरवात केली.

मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेद्वारे मांडकी खुर्द, मांडकी बु, खरवते, असुर्डे, दहिवली बु, दहिवली खुर्द आदी सात गावांना पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतील आगवे व मांडकी बु. गावच्या थकीत पाणीपट्टीचे प्रमाण अधिक आहे. मांडकी बु. गावाने एकूण सव्वा सहा लाख पाणीपट्टी जमा करावयाची आहे. यापैकी सुमारे 35 टक्केच वसुली झाली आहे. काही लोकांकडे सहा ते हजारची थकीत बिले आहेत.

ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपट्टी संबंधितांकडून जमा केली जात नव्हती. त्यामुळे जी कुटुंबे पाणीपट्टी भरणार नाहीत, त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय सात गावच्या शिखर समिती बैठकीत झाला होता. मांडकी व आगवे गावची जास्त थकीत रक्कम असल्याने दोन्ही गावचा पाणी पुरवठा खंडित करण्याचीही मागणी झाली होती. मात्र या दोन्ही गावातील जी कुुटुंबे नियमीत पाणीपट्टी भरतात, त्यांच्यावर अन्याय होईल, जे पाणीपट्टी भरत नाहीत, त्यांचा पुरवठा खंडित करण्याचे ठरले होते.

त्यानुसार मांडकी बु. ग्रामपंचायतीने थकीत धारकांना 15 दिवसांपूर्वी बिल भरण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यानंतर काहींनी थकीत बिले जमा केली. मात्र अपेक्षित वसुली होत नसल्याने ग्रामपंचायत व शिखर समितीने संयुक्तपणे कारवाईस सुरवात केली. दिवसभरात 22 ते 25 लोकांचे नळकनेक्शन तोडले. कारवाईला सुरवात होताच काहींनी पाणीपट्टी जमा केली. आज सुमारे 35 हजाराची पाणीपट्टी जमा झाली होती.

सरपंच सुषमा घाणेकर, ग्रामसेवक श्री. जड्याळ, पोलिस पाटील बारकू खाबे, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष विठू लोंढे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नारायण खैर, शिखर समिती अध्यक्ष रूपेश घाग, खरवते सरपंच सौ. घाग, ठेकेदार सुभाष गुरव आदींच्या उपस्थितीत कारवाई झाली.

थकीत पाणीपट्टी वसूल होण्यासाठी सातही गावात प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांकडे वारंवार मागणी करूनही थकीत रक्कम जमा होत नसेल तर नळकनेक्शन तोडण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाने दिले होते. त्यानुसार आजची कारवाई झाली. प्रादेशिक योजना नियमीत सुरू राहण्यासाठी सात गावच्या ग्रामस्थांनी सहकार्य करावे.  

- रूपेश घाग, सरपंच, दहिवली

Web Title: 25 families water cut due to non payment of bill