सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता

सावंतवाडी - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य हे कोणत्याही क्षणी अपात्र ठरू शकतात, परंतु त्या वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. ही कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले. 

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेल्या या 26 जि प सदस्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षांमध्ये आपली चुल मांडली आहे, परंतु त्यांना काँग्रेस पक्षाच्या परवानगीशिवाय स्वतंत्र चूल मांडता येत नाही किंवा स्वतंत्र गट तयार केला तर तरी या गटाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची संमती असणे आवश्यक आहे. जर त्यांनी तसे केले तर नव्या अध्यादेशानुसार त्यांचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. त्यामुळे या 26 सदस्यांच्या सदस्यवावर टांगती तलवार आहे.

याबाबतची कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 937 बुथ नियुक्ती झाल्यानंतर शीघ्र गतीने पक्ष ही कारवाई करेल असे सुतोवाच सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास भाई सावंत यांनी केले.

एक वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. मात्र काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषदच्या 26 सदस्यांनी काँग्रेसमध्ये न थांबता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षांमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई का केली नाही असा सवाल आजच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला. ही कारवाई तात्काळ करा अशी मागणी प्रदेशच्या प्रमुख नेत्यांकडे केली. त्यामुळे याप्रश्नी काँग्रेस पक्ष गंभीर झाला असून योग्य वेळी ही कारवाई केली जाईल, असे सुतोवाच विकास भाई सावंत यांनी केले आहे.

राणे प्रेमावर तू-तू-मैं-मैं

सावंतवाडी आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर सर्व प्रमुख मंडळी माजी नगराध्यक्ष अॅड दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले असता, त्या ठिकाणी खासदार नारायण राणे यांच्या प्रेमाबाबत जिल्हाध्यक्ष विकास सावंत आणि जिल्हा प्रवक्ते डॉ जयंत परुळेकर यांच्यामध्ये तू-तू मै-मै झाली. या दोघांमध्ये काँग्रेस पक्षाचे 26 जि प सदस्य आणि जिल्हा बँक संचालक यांच्यावरील कारवाईला विलंब होत असल्याबद्दल जोरदार चर्चा झाली. तुम्ही तात्काळ कारवाई का करत नाही तुम्हाला नारायण राणे प्रेम अधिक आहे काय असा सवाल परुळेकर यांनी केल्यानंतर जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर तसेच कोकण विभाग काँग्रेस सचिव संदीप यांच्यासह काँग्रेस प्रभारी पदाधिकाऱ्यांसमोर दोघांमध्ये तू-तू-मैं-मैं झाली अखेरीस खासदार दलवाई यांनी दोघांनाही समजावल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com