प्रदूषणमुक्त कोकणसाठी सायकलवरून 312 किमीची सवारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहाने तयार असतात. परंतु गोव्याला सायकलिंग करून जात प्रदूषणमुक्त कोकण हा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा मान येथील सायकलपटूंना मिळाला.

रत्नागिरी -  रत्नागिरी ते गोवा हे 312 किमीचे अंतर अवघ्या तीन दिवसात सायकलवरून यशस्वीरित्या पूर्ण करून येथील 10 सायकलपटूंनी "प्रदूषणमुक्त कोकण'चा संदेश दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्‍लब यांच्यावतीने ही सायकलची "कोकण भरारी' मोहीम आयोजित केली होती. 

गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहाने तयार असतात. परंतु गोव्याला सायकलिंग करून जात प्रदूषणमुक्त कोकण हा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा मान येथील सायकलपटूंना मिळाला. डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगरे, मंगेश शिंदे, माधव काळे, निमा काळे, किरण चुंबळकर या सायकलपटूंनी यात भाग घेतला. 

कोकणच्या सागर किनाऱ्यावरून प्रवास करत तीन टप्प्यात हा प्रवास पूर्ण झाला. त्यामध्ये पहिल्या दिवशी पावस, पूर्णगड, आडिवरे, धारताळे, नाटे, जैतापूर, कातरादेवी मंदिर, जामसंडे असा प्रवास करून सायकलपटू देवगड येथे राहिले. हा त्यांचा प्रवास 101.2 किमीचा होता. दुसऱ्या दिवशी देवगडहून निघून मीठबाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे यामार्गे वेंगुर्ले येथे सायकलपटू पोहोचले. हा प्रवास 106.5 किमी होता. तिसऱ्या दिवशी वेंगुर्ले येथून निघून मोचेमाड, शिरोडा मार्गे सर्वजण करमाळी, गोव्यात पोहोचले. हा प्रवास 104.3 किमीचा होता. यावेळी जिद्दी मौंटेनिअर्स च्या टीमने त्यांना सहकार्य केले. 

हा प्रवास करताना कोकणचे वेगळे सौंदर्य अनुभवता आले आणि हे सौंदर्य टिकवण्यासाठीच प्रदूषणमुक्तीकडे आपण गेले पाहिजे. कमीत कमी इंधन वाहने वापरून सायकलचा वापर वाढवला पाहिजे. हा संदेश या मोहीमेत आम्ही दिला. 
- डॉ. तोरल शिंदे  

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 312 KM Cycle Tour For Pollution Free Konkan Ratnagiri Marathi News