ऑनलाइन कामासाठी करावा लागतोय ३२ किलोमीटरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

नागरिकांना ऑनलाइन कामासाठी ३२ किलोमीटरपर्यंत दूर जावे लागते; तर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

आरवली (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्‍यातील राजिवली येडगेवाडी परिसरात भारत संचार निगमकडून भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात यावा, अशी मागणी पत्रान्वये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली आहे. येथील नागरिकांना ऑनलाइन कामासाठी ३२ किलोमीटरपर्यंत दूर जावे लागते; तर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी मागणी केलेल्या येडगेवाडी येथील मोबाईल टॉवरसंदर्भात भारत संचार निगम रत्नागिरीचे सहाय्यक महाप्रबंधक अविनाश पाटील यांनी २४ सप्टेंबरला उपसरपंच संतोष येडगे यांच्या उपस्थितीत परिसराची पाहणी केली होती. शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नागरिकांना शासकीय योजनेतील फॉर्म भरणे तसेच ऑनलाइन कामासाठी ३२ किलोमीटरपर्यंत दूर जावे लागते. जिल्हा परिषद शाळांसाठी उपयुक्त असणारी ओएफसी केबल टाकून नवीन मोबाईल टॉवर विशेष बाब प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -  मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात -

तालुक्‍यातील कुटगिरी येडगेवाडीसह राजिवली, रातांबी, पाचांबे, कुचांबे, कुंभारखाणी, कुटरे, येगांव, मुरडव आदी गावांमध्ये बीएसएनएल मोबाईलला नेटवर्क नाही. इतर खासगी मोबाईल टॉवर कंपन्यांच्या नेटवर्कला अखेरची घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजिवली ग्रामपंचायतीने भारत संचार निगमचे रत्नागिरी महाव्यवस्थापक यांच्याकडे २४ जानेवारी २०१६ ला प्रथम येडगेवाडी या ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी केली होती.

उंचीवर असलेल्या येडगेवाडीत मोबाईल टॉवर उभारून नॉट रिचेबल गावांना नेटवर्क कक्षेत आणावे, ही प्रमुख मागणी आहे. राजिवलीचे उपसरपंच  संतोष येडगे यांनी ही बाब खासदार सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रभू यांनी तातडीने केंद्रीय दूरसंचार कार्यालयाशी चर्चा करत विशेष बाब प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आहे.
 

विशेष बाब म्हणून मंजुरीचा प्रयत्न 

३१ ऑक्‍टोबरला खासदार सुरेश प्रभू यांच्या कार्यालयातून मोबाईल टॉवरसंदर्भात उपसरपंच संतोष येडगे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत आपला दूरसंचार मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असून, येडगेवाडी येथील मोबाईल टॉवर प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांना सांगितले होते. प्रभूंनी दूरसंचार कार्यालयाला मनोरा उभारण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - विरोधकांनी भाजपचा धसका घेतलाय ; विकास केल्यानेच माझी बदनामी -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 kilometers travel for any online work done in ratnagiri demand the citizen