सिंधुदुर्गात 36 हजार क्विंटल भात खरेदी 

तुषार सावंत
Thursday, 14 January 2021

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या भाताला सरकारनेही यंदा चांगला दर दिला. शासकीय भात खरेदी केंद्रावर 2568 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) -  खरिप हंगामातील भात खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आतापर्यंत 36 हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे. यंदा 60 ते 70 हजार क्विंटल भात खरेदी होईल, अशी अपेक्षा असून जवळपास 42 केंद्रावर सध्या भात खरेदी सुरू आहे. 

जिल्ह्यातील भात शेतीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. जवळपास 74 हजार हेक्‍टर क्षेत्रात खरिपाची भात लागवड झाली आहे. यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा अनेक नैसर्गिक संकटातून शेतकरी जात असताना कोरोना, लॉकडाउन याचाही मोठा परिणाम भातशेती उत्पादनावर झाला होता; मात्र शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या भाताला सरकारनेही यंदा चांगला दर दिला. शासकीय भात खरेदी केंद्रावर 2568 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत.

यंदा 1868 इतका भाताला हमीभाव असून 700 रुपये बोनसही दिला जात आहे. जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघ आणि गाव पातळीवर भात खरेदी केंद्र सुरू केले आहे. मधल्या काळात बारदानाची अडचण होती; मात्र जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सहकार मंत्र्यांशी थेट संपर्क साधून भात खरेदीसाठी बारदान उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

शासकीय भात केंद्रावर कोणत्याही जातीचे बियाणे असले तरी भात खरेदी केले जात आहे. यात काही लोक गैरसमजही पसरवत आहेत; मात्र जुन्या काळातील वालय, बेळा, किंवा लाल भात ही शासकीय खरेदी केंद्रावर होत आहे. यंदा 31 मार्चपर्यंत भात खरेदी सुरू राहणार आहे. 

जिल्ह्यात शासकीय भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जात आहे. यासाठी बारदानाची उपलब्धता झाली आहे. सर्व केंद्रावर ही बारदाणे पोच केली जातील. जिल्हाधिकाऱ्यांनी 49 भात खरेदी केंद्राला मान्यता दिली असून सध्या 42 केंद्रावर ऑनलाइन भात खरेदी सुरू आहे. 
- एन.जी. गवळी, मार्केटिंग फेडरेशन 

पीक- पाणी नोंद नसल्यास दाखला ग्राह्य 
ज्या शेतकऱ्यांनी शेतात भात पिकवले आहे. अशा शेतकऱ्यांचा सातबारा आवश्‍यक आहे; मात्र सातबारावरती भात लागवडीची नोंदणी नसल्याने अडचणी येत होत्या; मात्र जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पीक पाणी नसलेल्या सातबारासाठी गाव तलाठ्यांचा दाखला मान्य केला आहे. त्याबाबत त्यांनी परिपत्रक काढून सर्व तहसीलदारांना कळवल्याची माहिती बजाज राईस मिलचे संदीप चव्हाण यांनी दिली. 

31 मार्चपर्यंत खरेदी 
* 60 हजार क्विटल भातखरेदी अपेक्षा 
* भातपिकपाणीसाठी तलाठी दाखल 
* 1868 भाताला हमीभाव 
* खेरीपच्या खरेदीवर 700 रूपये बोनस 
* गतवर्षी 35 हजार क्विटल खरेदी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 thousand quintal paddy Sindhudurg district