चौपदरीकरणाची भरपाई अमान्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

संघर्ष समिती : फेरनिवाडा करण्याची मागणी; हरकतींना केराची टोपली दाखवली

संघर्ष समिती : फेरनिवाडा करण्याची मागणी; हरकतींना केराची टोपली दाखवली

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण संबंधित भूसंपादनाचा प्रस्तावित केलेल्या निवाड्याची रक्कम मान्य नाही. महामार्गाच्या बाजारभावाप्रमाणे निवाडा जाहीर करून जमीन मालकाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. याबाबत महामार्ग भूसंपादन संघर्ष समितीची बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला जाईल. न पेक्षा भूसंपादनाचा फेरनिवाडा सादर करावा, अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद कर्ले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.

चौपदरीकरणाला विरोध नाही. प्रशासनाला आम्ही नेहमीच सहकार्य केले; मात्र प्रशासनाने व नेते, आमदार, खासदार यांनी संबंधित जमीनमालकांना तुटपुंज्या स्वरूपात मोबदला देऊन भागविण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनाचे निवाडे जाहीर केले. यात 35 गावांना साधारणतः 734 कोटी 82 लाख 26 हजार 403 रुपये भरपाई मिळावी, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे पाठविला आहे. या निवाड्यास आमचा विरोध आहे. कारण हा निवाडा तयार करताना महामार्गालगचा बाजारभाव लक्षात घेणे गरजेचे होते. त्या दृष्टीने प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न करता उलट हा निवाडा बाजारभावाप्रमाणे केला आहे. यामुळे जमीनमालकांना मुबलक प्रमाणात मोबदला मिळणार नाही. निवाडा जाहीर करून मिळणारा मोबदला जाहीर केला असला तरी या निवाड्याचे काम करताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. येथील जमिनीना भविष्यात मिळणारी किंमत याचा विचार झालेला नाही. प्रशासनाच्या सूचनेनुसार महामार्ग चौपदरीकरणासाठी कित्येक हरकती घेतल्या होत्या. त्या हरकतींमध्ये जमीन मालकांनी आपल्या समस्या व मागण्या केल्या होत्या. मात्र प्रशासनाने या हरकतीवर सुनावणी न घेताच सर्वसामान्य नागरिकांच्या हरकतीना केराची टोपलीच दाखविली. मंत्री आमदार, खासदारांनीही संघर्ष समितीला दिलेल्या आश्‍वासनाला पाने पुसली आहेत.

तीव्र आंदोलन छेडणार
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला निवाडा आम्हाला मान्य नाही. त्यांनी फेर सुधारित निवाडा जाहीर करावा. अन्यथा मुंबई-गोवा महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यासाठी येत्या चार दिवसांत जमीनमालकांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद कर्ले यांनी सिंधुदुर्गनगरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: 4 lenroad compensation invalid