मालवणात बंदी आदेश मोडल्या प्रकरणी 40 दुचाकी जप्त 

40 Bicycles Seized In Malvan Sindhudurg Marathi News
40 Bicycles Seized In Malvan Sindhudurg Marathi News

मालवण ( सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रामध्ये दुचाकीने फिरण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्यानंतर मालवणात शहरात बुधवार (ता. 1) सकाळपासून पोलिसांनी दुचाकीने फिरणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे 40 दुचाकी जप्त केल्या.

पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली या धडक कारवाईमुळे संचारबंदी तोडून विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्यांना चाप बसला असून बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीवरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. 

देशात लॉकडाऊन लागू असतानाही विनाकारण बाहेर पडून रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी दिसत आहे. दुचाकीने फिरणारे बरेच जण असल्याने जिल्ह्यातील बाजारपेठा व रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काल सायंकाळी आदेश पारीत करीत मध्यरात्री 12 वाजल्यापासून अत्यावश्‍यक सेवेतील व वाहतूक पासधारक व्यक्तींना वगळून इतर दुचाकीने फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून दुचाकी जप्त करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या.

या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून मालवण पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी अलौन्सिंग करत दुचाकीने न फिरण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या. मात्र आज सकाळी मालवण शहरात अनेक जण दुचाकीने फिरताना दिसून आले. काहीजण बाजारात जाण्यासाठी तर काही अन्य कारणानिमित्त दुचाकीने फिरत होते. मालवण पोलिसांनी भरड नाका, फोवकांडा पिंपळ, बाजारपेठ येथे बंदोबस्त ठेवून विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्यांना अडवून त्यांच्या दुचाकी जप्त करून कारवाई केली. सुमारे 40 पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

काहींनी निवडला सायकलचा पर्याय 

मालवण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दुचाकीस्वारांमध्ये चांगलीच धडकी भरली. दुचाकी जप्त होईल या भीतीने अनेक जण पायी फिरून आपली कामे करत होते. तर काहींनी शक्कल लढवीत आपल्या सायकल बाहेर काढून सायकलने ये- जा करत होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर सायकली जास्त दिसत होत्या. तर अत्यावश्‍यक सेवेसाठी रिक्षातून प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. मालवणात अनेक नागरिक सकाळच्या वेळेत दुचाकीने बाजारात येत असल्याने पोलिसांच्या या मोहिमेमुळे बाजारात येणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीही कमी होऊन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com