विश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

अमित गवळे
रविवार, 22 एप्रिल 2018

प्लास्टिकबंदीची चळवळ ही प्रत्येकाच्या घराघरात पोचणे आवश्यक आहे. या उद्देशाने हे काम सामाजिक सेवा म्हणून करत आहे. उच्चभ्रू नागरिकांना अद्याप कापडी पिशवी हातात घेऊन बाजारात जाणे, ही संकल्पना मनी उतरत नाही. तर, लोकप्रतिनिधींना मोफत पिशव्यांचे वाटप करूनही त्यात स्वारस्य वाटत नाही.

- विश्वास गोफण, पर्यावरणप्रेमी व कापडी पिशव्या निर्माते

पाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर त्याला कापडी पिशव्याच योग्य पर्याय आहे. त्यामुळेच रायगड जिह्यातील सुधागड तालुक्यातील भार्जे गावचे रहिवासी व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेले विश्वास गोफण हे अवलिया पर्यावरणप्रेमी मागील सात वर्षांपासून स्वखर्चातून कापडी पिशव्या शिवून त्याचे विनामूल्य वाटप करत आहेत.

गोफण यांनी ठाणे-सुधागडातील खासदार, आमदार,नगरसेवक, सरपंच, सदस्य, विरोधी पक्षनेत्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत एक सामाजिक व्रत म्हणून 2011 पासून आतापर्यंत सुमारे 45 हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. विश्वास गोफण यांनी आपल्या निस्वार्थी वृत्तीतून पर्यावरणसंवर्धनासाठी दिलेले योगदान समाजापुढे आदर्श आहे. राज्य सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा योग्य गौरव करावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

राज्य प्रदूषण मंडळाने त्यांच्या या कापडी पिशवी वाटपबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, ज्यावेळी अशा समाजसेवी व्यक्ती किंवा संस्था कापडी पिशवीच्या प्रचारासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांना नक्कीच संधी देण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी दिली. विश्वास गोफण यांची कापडी पिशव्यांची चळवळ गतिमान होण्यासाठी लोकसहभाग व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. 

प्लास्टिकचा दुष्परिणाम विश्वास गोफण यांना ठाऊक झाला आणि मग काळाची गरज ओळखून त्यांनी सात वर्षांपूर्वी स्वतःची पदरमोड करून कापडी पिशव्या बनविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला घरातील शर्टपीस संपेपर्यत शर्टपीसच्या पिशव्या शिवून नातेवाईकांमध्ये वाटल्या. त्यानंतर त्याच नातेवाईकांना तुम्हाला नको असणारा शर्टपीस-पँटपीस मला द्या. यातून सहा पिशव्या मोफत शिऊन देईन. त्यापैकी चार तुमच्या आणि दोन मला समाजातील नागरीकांना जनजागृती करण्याकरीता विनामूल्य वाटप करण्यासाठी देण्याचे आवाहन केले.

याला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर गोफण यांनी दादरच्या घाऊक बाजारात तागा विकून जे कापड शिल्लक राहते ते किलोच्या दराने विकत घेण्यास सुरवात केली. साधारणपणे एक किलो कापडामधून 12 बाय 15 मापाच्या 17 ते 18 पिशव्या तयार होत असून, यातून पाच किलो किराणा मालाचे सामान येऊ शकते, असा विश्वास गोफण यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केला. याचबरोबर बँकेचे पासबुक, टिफीन बॅग ठेवण्यासाठीही लहानशा पिशव्या गोफण यांनी तयार केल्या आहेत. पर्यावरणपूरक आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असे सामाजिक संदेश अधोरखित असणाऱया कापडी पिशव्या देखील गोफण यांनी शिवल्या आहेत.

Web Title: 45 Thousand Cotton Bags Free Distribution by Vishwas Gofan