कणकवलीमध्ये युतीचा ५-३ फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

कणकवली - उमेदवारी यादी जाहीर न करता आपापसात तोडगा काढून पूर्वी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेला पाच, तीन आणि पंचायत समितीला प्रत्येकी आठ जागा असा फॉर्म्युला शिवसेना-भाजप युतीमध्ये ठरला आहे. याबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय होऊन उमेदवारांना थेट पक्षाचे एबी फॉर्म देण्याची तयारी सुरू झाली आहे. 

कणकवली - उमेदवारी यादी जाहीर न करता आपापसात तोडगा काढून पूर्वी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेला पाच, तीन आणि पंचायत समितीला प्रत्येकी आठ जागा असा फॉर्म्युला शिवसेना-भाजप युतीमध्ये ठरला आहे. याबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय होऊन उमेदवारांना थेट पक्षाचे एबी फॉर्म देण्याची तयारी सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवस आहेत. यापूर्वी उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला जातो. परंतु या खेपेस सर्वच पक्षांची सावध भूमिका घेत बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राज्यस्तरावर युती तुटली असली तरी स्थानिक पातळीवर काँग्रेस विरोधक म्हणून एकत्र येण्याची तयारी सुरू आहे. या खेपेस संधी न घेतल्यास पुढील पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मुकावे लागेल आणि पायाभूत विकास साधण्यासाठी मर्यादा येतील. परिणामी दोन्ही पक्षांना नुकसान सहन करावे लागेल. मतविभागणीचा फायदा काँग्रेसला होईल आणि आपल्याला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागेल, असे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना वाटत आहे. 

कणकवली तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी कासार्डे, बिडवाडी, कलमठ, फोंडाघाट आणि हरकुळ बुद्रुक हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर शिवसेनेला नाटळ, कळसुली आणि खारेपाटण हे मतदारसंघ दिले जाणार आहेत. या मतदारसंघातील पंचायत समितीचे गट दोन्ही पक्षाचे उमेदवार आणि पक्षीय ताकद यावर प्रत्येकी आठ असे विभागून घेतले जाणार आहेत. आरक्षण पडल्यापासून तशी तयार सुरू आहे. दोन्ही पक्षातर्फे आपले उमेदवार कोण असतील याची चाचपणी झाली आहे. परंतु अंतिम निर्णय मात्र जाहीर झालेला नाही. जिल्हा परिषदेच्या सत्तेतील काँग्रेसला दूर करण्यासाठी त्या पक्षाची यादी जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत युतीकडूनही सावध पावले उचलली जात आहेत. 

काँग्रेसला शह देण्यासाठी प्रयत्न
कणकवली तालुक्‍यात शिवसेना-भाजप युतीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेली १५ वर्षे यश मिळालेले नाही. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातील ग्रामीण मतदार त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे चार-पाच ग्रामपंचायती वगळता इतर सर्व सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे. सहकार तर एकहाती आहे. या सगळ्याला शह देण्यासाठी युतीने सातत्याने प्रयत्न केला. परंतु यश आलेले नाही. या वेळी होणारी युतीसुद्धा तुटेपर्यंत आली आहे. परंतु दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या मर्यादांची कल्पना असल्याने कणकवलीसाठी युती व्हावी, असाच प्रयत्न अजून तरी सुरू आहे.

Web Title: 5-3 alliance formula in kankavali