अर्जुनाकाठच्या विकासासाठी पाच कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

राजापूर - अर्जुना नदी खोरे समृद्धी अभियानांतर्गत तालुक्‍यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या काठावरील गावांचा विकास करण्यासाठी तालुक्‍याला पहिल्या टप्प्यामध्ये शासनाकडून तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संजय यादवराव यांनी ही माहिती दिली. या निधीतून जलसंधारणाची कामे हाती घेऊन गावा-गावांमध्ये जलसाठे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. 

राजापूर - अर्जुना नदी खोरे समृद्धी अभियानांतर्गत तालुक्‍यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या काठावरील गावांचा विकास करण्यासाठी तालुक्‍याला पहिल्या टप्प्यामध्ये शासनाकडून तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संजय यादवराव यांनी ही माहिती दिली. या निधीतून जलसंधारणाची कामे हाती घेऊन गावा-गावांमध्ये जलसाठे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यात कामे करण्यात येणाऱ्या सात गावांमध्ये करक, तळवडे, रायपाटण, सौंदळ, मुसलमानवाडी, पाचल, कोळवणखडी आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये जलसंधारणाअंतर्गत सिमेंट नालेबंधारे, गॅबियन बंधारे, नद्यांच्या डोहामधील गाळ उपसा, दगडी बंधारे, वळण बंधारे आदी स्वरूपाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. 

नद्यांच्या काठावरील गावांचा विकास करण्यासह कोकणातील नद्या बारमाही वाहण्याच्या अनुषंगाने कोकण भूमी प्रतिष्ठानने नद्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी कोकणातील पाच नद्यांची प्राथमिक टप्प्यामध्ये निवड केली असून त्यामध्ये तालुक्‍यातील अर्जुना नदीचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत अर्जुना नदीतील काही डोहांमधील गाळाचा लोकसहभागातून उपसाही करण्यात आला. त्यातच या अभियानांतर्गत नदीच्या काठावरील तब्बल २८ गावांचे सर्वेक्षण करून त्याचवेळी त्या गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधून विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यामध्ये समाविष्ट असलेली विकासकामे पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केले होते.

त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये तालुक्‍याला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती श्री. यादवराव यांनी दिली. या आराखड्याची तालुक्‍यात अंमलबजावणी करण्यासाठी वासुदेव तुळसणकर, काशिनाथ पाटील, ॲड. एकनाथ मोंडे आदींच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या देखरेखेखाली ही कामे होणार असल्याचे श्री. यादवराव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या अभियानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार असून त्याद्वारे नद्यांच्या काठावरील गावांचे विकासातून अर्थकारण बदलण्याला साह्य होईल.

मनरेगाअंतर्गत लागवड
अर्जुना नदी खोरे समृद्धी अभियान विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये मनरेगांतर्गत वन लागवड आणि फळ लागवडही करण्यात येणार आहे. काजू, शिवण, साग, बांबू, आंबा, नारळ आणि चिकू अशा उत्पन्न देणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या लागवडीतून लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल.

Web Title: 5 crorer find to arjuna river village development