नगराध्यक्ष, उपनराध्यक्षांसह कणकवली पाचजणांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

कणकवली : येथील नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह ऍड. प्रज्ञा खोत, रूपेश नार्वेकर, सुमेधा अंधारी यांच्या विरोधातील अर्ज आज जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला. यामुळे पारकर गटाच्या पाचही नगरसेवकांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली आहे. कॉंग्रेसमधील राणे गटाच्या नगरसेविका सुविधा साटम यांनी पाच नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे 2015 मध्ये दाखल केला होता.

कणकवली नगरपंचायतीची तिसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2013 मध्ये झाली. यात कॉंग्रेसचे 13, शिवसेना 3 आणि भाजप 1 असे नगरसेवक निवडून आले. त्यानंतर कॉंग्रेसच्या ऍड. प्रज्ञा खोत नगराध्यक्ष तर समीर नलावडे उपनगराध्यक्ष झाले. या दोघांची मुदत ऑक्‍टोबर 2015 मध्ये संपली.

यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीवेळी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. युवा नेते संदेश पारकर यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या गटाचे ऍड. प्रज्ञा खोत, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, सुमेधा अंधारी आणि माधुरी गायकवाड यांनी बंडखोरी केली. कॉंग्रेसने सुविधा साटम नगराध्यक्षपदासाठी तर बंडू हर्णे उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर केले. पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांनी नगराध्यक्ष तर कन्हैया पारकर यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मतदानावेळी पारकर गटाचे 5 नगरसेवक आणि विरोधी पक्षाचे 4 अशा 9 जणांच्या पाठबळावर पारकर गटाचे उमेदवार निवडून आले. कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार एका मताने पराभूत झाले.

या निकालानंतर नगरसेविका सुविधा साटम यांनी, पारकर गटाच्या 5 नगरसेवकांनी पक्षशिस्तीचा भंग करणे, व्हीप धुडकावणे प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. सुनावणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गटाचे म्हणणे स्वतंत्र ऐकून घेतले. दोन्ही वकिलांनीही बाजू मांडली. पारकर गटाच्या नगरसेवकांतर्फे ऍड. उमेश सावंत यांनी बाजू मांडली.

या मुद्द्यांवर फेटाळला अर्ज
जिल्हाधिकाऱ्यांनी साटम यांचा अपात्रतेचा अर्ज नामंजूर केला. यात कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी नगरसेवकांना बजावलेला व्हीप नियमानुसार आणि कायदेशीर नाही. कॉंग्रेस नगरसेवकांच्या सभेत कॉंग्रेसच्या 13 नगरसेवकांची उपस्थिती नसणे, सुनावणी वेळी अनेकदा अर्जदार आणि त्यांच्या वकिलांची अनुपस्थिती तसेच नगरसेवक अपात्र ठरविण्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता नसणे आदी मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहेत.

Web Title: 5 people get relief in elections