माडबन किनारी पाचशे मिटर लांबीची वाळूची टेकडी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 May 2019

एक नजर

  • राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन आणि मिठगवाणे गावच्या हद्दीवर काही दिवसांपूर्वी तयार झाला सॅण्डबार (वाळूची टेकडी वा उंचवटा).
  • सँडबार सुमारे चार फूट उंच आणि पाचशे मीटर लांब. 
  • भरतीच्यावेळी खाडीमध्ये येणाऱ्या समुद्राच्या पाण्यास सॅन्डबारमुळे अडथळा. 
  • या परिसरामध्ये प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे किनार्‍यावरील माडबन आणि मिठगवाणे परिसरातील सुमारे 65 विहिरींच्या पाणीपातळी घट. 

राजापूर - तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन आणि मिठगवाणे गावच्या हद्दीवर काही दिवसांपूर्वी सॅण्डबार (वाळूची टेकडी वा उंचवटा) तयार झाला आहे. सुमारे चार फूट उंच आणि पाचशे मीटर लांबीच्या या सॅण्डबारमुळे भरतीच्यावेळी खाडीमध्ये येणारे समुद्राच्या पाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या परिसरामध्ये प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे किनार्‍यावरील माडबन आणि मिठगवाणे परिसरातील सुमारे 65 विहिरींच्या पाणीपातळी घटली असून दोन्ही गावांमधील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.    

दरम्यान, आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळी भेट दिली असून अडचणीचा ठरत असलेला सॅण्डबार तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीच्या साह्याने काढण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी केल्या आहेत.

समुद्र किनार्‍यावरील मिठगवाणे आणि माडबन गावच्या हद्दीमध्ये जैतापूर खाडीच्या मुखाशी वाळूची टेकडी तयार झाल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सुमारे चार फूट उंच आणि पाचशे मीटर लांबीचा हा सॅण्डबार आहे. वाळूची ही टेकडी नेमकी कशामुळे आणि कशी निर्माण झाली याची निश्‍चित माहिती नसली तरी नैसर्गिकरित्या तयार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या सॅण्डबार वा टेकडीमुळे समुद्राचे भरतीच्यावेळी खाडीमध्ये येणारे पाणी अडले जात आहे. त्याचा फटका मिठगवाणे आणि माडबनमधील खाडीच्या मुखाच्या परिसरातील विहिरींना बसू लागला आहे. यामुळे निर्माण झालेली वाळूची टेकडी काढून टाकावी अशी मागणी लोकांमधून केली जात आहे.  

पावसाळ्यात आपत्तीची शक्यता

खाडीच्या मुखाशी तयार झालेली वाळूची टेकडी पावसाळ्यापूर्वी काढून टाकली नाही तर पुराचे पाणी शेतासह लोकवस्तीमध्ये घुसून माडबन आणि मिठगवाणेमध्ये पावसाळ्यात आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून मिठगवाणे आणि माडबनच्या खाडी किनार्‍यावरील घरांना पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची भीती लोकांमधून व्यक्त केली जात आहे.    

“माडबन आणि मिठगवाणे गावच्या हद्दीमध्ये सॅण्डबार निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी खाडीमध्ये जात नाही. सॅण्डबारमुळे पावसाळ्यात त्या परिसरातील घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.”
- रजनीकांत पाटील,
बंदर निरीक्षक जैतापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 meter long sand hill created on Madban beach