पाचशेच्या नोटांनी दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कणकवली - बहुतांश एटीएम सेंटरमधून पाचशेच्या नोटा उपलब्ध होऊ लागल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. नोटाबंदीनंतर दोन हजाराचीच नोट उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांसह बाजारपेठांतील व्यवहार ठप्प झाले होते. आता पाचशेच्या नोटा उपलब्ध होऊ लागल्याने बाजारपेठांतील उलाढाल पुन्हा एकदा वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कणकवली - बहुतांश एटीएम सेंटरमधून पाचशेच्या नोटा उपलब्ध होऊ लागल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. नोटाबंदीनंतर दोन हजाराचीच नोट उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांसह बाजारपेठांतील व्यवहार ठप्प झाले होते. आता पाचशेच्या नोटा उपलब्ध होऊ लागल्याने बाजारपेठांतील उलाढाल पुन्हा एकदा वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून त्याचे स्वागतच झाले. पण शंभर रुपयानंतर थेट दोन हजाराचीच नोट उपलब्ध असल्याने सर्वच व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. मागील दोन दिवसांत प्रमुख बॅंकांनी आपल्या एटीएम सेंटर कॅलिबरेट केली. त्यामुळे आजपासून एटीएम सेंटरमध्ये शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

यापूर्वी स्टेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी तसेच इतर बॅंकांच्या एटीएम केंद्रातून शंभर आणि दोन हजार रुपयांच्याच नोटा उपलब्ध होत होत्या. यात बहुतांश वेळा शंभरच्या नोटाच नसल्याने दोन हजार रुपयांच्याच नोटा दिल्या जात होत्या. दोन हजाराची नोट सुटी करताना मोठी मुश्‍कील होत होती. दरम्यान, एटीएममधूनच पाचशे व शंभराच्या नोटा ग्राहकांना दिल्या जाव्यात असे आदेश रिझर्व्ह बॅंकेने जारी केले आहेत. त्यामुळे बॅंकांमधील रांगा कमी होतील तसेच बॅंकांवर येत असलेला कामाचा ताण कमी होईल व नागरिकांनाही सम प्रमाणात नोटा उपलब्ध होतील अशी माहिती बॅंकेतील अधिकाऱ्यांकडून आज देण्यात आली.
पाचशेच्या नोटा एटीएममधूनच द्याव्यात असे रिझर्व्ह बॅंकेचे निर्देश असल्याने गेल्या महिन्यापासून बंद असलेली सर्व एटीएम सेंटर्स या आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार बॅंकांनी त्याना मिळालेल्या रोकडीतील मोठा हिस्सा एटीएममध्ये भरायचा आहे. तसेच एटीएम रिकामी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेने आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना चालू असलेले एटीएम शोधण्यासाठीची वणवण थांबणार आहे. 
सध्या एटीएममधून दिवसाला २५०० रुपये काढण्याची मुभा आहे. गेले दीड महिना थांबलेली उलाढाल पुन्हा सुरू झाली असेल तर एटीएमची मर्यादाही वाढविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारीवर्गातून होत आहे, मात्र अडीच हजाराची मर्यादा संपण्यास मात्र आणखी थोडी वाट पहावी लागेल असे बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कॅशलेससाठी व्यापाऱ्यांचा पुढाकार
नोटीबंदीचा मोठा फटका विविध क्षेत्रातील व्यापारी वर्गाला बसला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी एटीएम स्वाईप मशीन कार्यान्वित केल्या आहेत. तसेच त्या माध्यमातून आर्थिक देवघेवीच्या व्यवहारांना सुरवात झाली आहे. मात्र स्वाईप मशीनच्या माध्यमातून बॅंकेत जमा होणारी रक्‍कम त्या व्यापाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास दोन ते सात दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी व्हावा, अशीही व्यापारी वर्गाची मागणी आहे.

Web Title: 500 rs. currency in market