मुंबई-गोवा महामार्गावरील ५२ हजार झाडे तोडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. संगमेश्‍वर ते तळेकांटे येथील रखडलेल्या कामालाही वेग आला आहे. वन विभागाने महामार्गावरील ५२ हजार झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली आहे. पर्यायी झाडे लावण्यावरही भर असेल.

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. संगमेश्‍वर ते तळेकांटे येथील रखडलेल्या कामालाही वेग आला आहे. वन विभागाने महामार्गावरील ५२ हजार झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली आहे. पर्यायी झाडे लावण्यावरही भर असेल.

चौपदरीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्य ठेकेदाराने कामात दिरंगाई केल्याने मार्गावरील १४ पुलांची कामे रखडली होती. अखेर शासनाने या ठेकेदाराचा ठेका काढून घेतला आहे. ज्या कंपन्या सहा टप्प्यात महामार्गाचे काम करीत आहेत. त्यांच्यावरच त्या-त्या भागातील पुलाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तीही रखडलेली कामे गती घेणार आहेत.

जिल्ह्यातील सहा पॅकेजमध्ये पर्शुराम घाट ते आरवली चाळीस किलोमीटर, आरवली ते तळेकांटे ३६ कि.मी., बावनदी ते वाकेड ५१ कि.मी., वाकेड ते खारेपाटण ३५ कि.मी., खारेपाटण ते कणकवली ३९ कि.मी., कणकवली ते झाराप ४४ कि.मी., असे टप्पे केले आहेत. सर्व कामे प्रगतिपथावर होती. त्याला संगमेश्‍वर ते तळेकांटे हा भाग अपवाद होता. त्या कामानेही आता गती घेतली आहे. 

महामार्गाच्या कामात येणाऱ्या झाडांचा सर्व्हे यापूर्वी केला होता. वन विभागामार्फत हा सर्व्हे होऊन किती झाडे तोडावी लागणार, यावर अभ्यास झाला. कत्तल होणाऱ्या झाडांची संख्या मोठी असल्याने त्याला पर्यायी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. वन विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार झाडे तोडावी लागतील. तशी परवानगी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गामध्ये येणाऱ्या झाडांचा सर्व्हे करून ५२ हजार झाडे तोडण्याची परवानगी आम्ही महामार्ग विभागाला दिली आहे. महामार्गाची निश्‍चित सीमा तयार झाल्यानंतर त्याला लागून झाडांची फेरलागवड करण्यात येईल.
- विजयराज सुर्वे,
विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी

Web Title: 52 thousand trees will be cut off on Mumbai-Goa highway