esakal | 2 महिन्याचा कालावधी संपला; कोविड सेंटरमधील 62 नर्सनी काम थांबवले
sakal

बोलून बातमी शोधा

2 महिन्याचा कालावधी संपला; कोविड सेंटरमधील 62 नर्सनी काम थांबवले

2 महिन्याचा कालावधी संपला; कोविड सेंटरमधील 62 नर्सनी काम थांबवले

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोनाचा जिल्ह्यात (ratnagiri district) कहर सुरू असताना आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी येथील द एस फाउंडेशन, परकार हॉस्पिटलच्या नर्सिंग (nurse) कॉलेजच्या ६२ मुलींना सेवेत सामावून घेतले होते; मात्र या मुलींचा दोन महिने पगार न झाल्याने त्यांनी काम थांबवले आहे. याचा महिला रुग्णालयातील कोविड सेंटरवर (covid center) मोठा परिणाम झाला आहे. येथे एक विभाग बंद पडल्याने गैरसोय निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दोन महिन्याचा त्यांचा सेवेचा कालावधी संपला आहे म्हणून त्यांनी काम थांबवले आहे. त्यांच्या पगाराची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात कोरोना (covid -19) महामारीने थैमान घातले होते. गेल्या तीन दिवसांमध्ये बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे; मात्र जेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता, तेव्हा बाधितांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर कमी पडत होती. खासगी रुग्णालयांमध्येही कोविड सेंटर तयार करण्यात आली, परंतु ती अपुरी पडू लागली. आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडू लागला. यातून कोविड सेंटरमध्ये योग्य सेवा मिळत नसल्यावरून वाद वाढत चालले.

हेही वाचा: SSC Result 2021: कोकणची पोर हुशारच; यंदाही मारली बाजी

मंत्री उदय सामंत (uday samant) आणि तत्कालीन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी काहीतरी पर्याय निघावा म्हणून सर्वपक्षीय, पोलिस, सामाजिक संस्था आदींची बैठक बोलावली. या बैठकीनंतर प्रत्येकाने शक्य ती मदत करण्यास सुरवात केली. आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा, बाधितांना योग्य सेवा मिळावी यासाठी काही नर्सिंग कॉलेजच्या मुलांना आरोग्यसेवेत घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन महिला रुग्णालय व अन्य ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये सेवा सुरू केली.

कोरोनाच्या अडचणीच्या काळात या ६२ मुलींची कोविड रुग्णालयांमध्ये चांगलीच मदत झाली. गेले दोन ते तीन महिने सेवा दिली. त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून पगार दिलेला नाही. अडचणीच्या काळात सेवा देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी महिला रुग्णालय कोविड सेंटरमधील काम थांबविले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नर्सेस बाहेर पडल्याने कोविड सेंटरवरील सेवेवर परिणाम झाला आहे. अजूनही या सेंटरमध्ये १५० बाधित उपचार घेत आहेत. त्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या.

हेही वाचा: घाट रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात मग नाव आंबा घाट का?

"कोरोनाचा अतिसंसर्ग फैलावत असताना रत्नागिरीतील काही नर्सिंग कॉलेजच्या नर्सना प्रशिक्षण देऊन सेवेत घेतले होते. दोन महिन्यासाठी त्यांना सामावून घेतले होते. तो कालावधी संपला आहे. म्हणून त्यांनी काम थांबविले आहे. त्यांच्या पगाराचा विषय प्रक्रियेत असून लवकरच होईल."

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी

loading image