Photo : बोरखत कातळावर पुन्हा अवतरले ' स्वच्छतादूत ' : आठ वर्षांनी ६५ गिधाडांचे दर्शन...

सचिन माळी
Wednesday, 22 July 2020

निसर्गरम्य जंगल भाग; परिसरात अनेक दुर्मिळ प्राण्यांचाही अधिवास...

मंडणगड (रत्नागिरी) : पर्यावरणाच्या जैव साखळीमध्ये महत्वाचा घटक असणारे अत्यंत दुर्मिळ होत चाललेलले आणि निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ज्यांना संबोधले जाते ती सुमारे ६५ गिधाडे दोन दिवस बोरखत कातळावर आठ वर्षांनी पुन्हा अवतरली. तालुक्यातील बोरखत, गोठे परिसरातील या दुर्मिळ पक्षाचा वावर हा आशादायी ठरतो आहे.

बोरखत कातळ परिसरात मृत जनावर खाण्यासाठी ही गिधाडे आली असल्याची माहिती ग्रामस्थ जितेंद्र दवंडे यांनी सकाळशी बोलताना दिली. त्यामुळे याठिकाणी संवर्धन मोहीम राबवणे योग्य ठरणार आहे. मध्यंतरी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने पाहणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा- कोरोनाचा सहावा बळी :  मृत्यूनंतर तीचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह अन्... -

 गिधाड म्हटलं, की अनेक लोकांसमोर कुठल्यातरी घाणेरडय़ा अशा पक्ष्याची छबी तयार होते. परंतु हे पक्षी निसर्गातल्या अन्नसाखळीचे महत्त्वाचे घटक आहेत. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आहेत. ही प्रत्येक जात महत्त्वाची आणि गरजेची आहे. हे पक्षी आळशी, कुरूप आणि बीभत्स जरी वाटत असले तरी  हे पक्षी महत्त्वाचे आहेत. गिधाड मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात. यांना निसर्गातील सफाई कर्मचारी म्हटले जाते.

हेही वाचा- कळसच : कोरोना बाधित रुग्णास आणावयास गेलेल्या पथकासह पोलिसांनावर केली दगडफेक.... -

२१ जुलै रोजी बोरखत गावातील शेतकरी सदानंद जोशी यांचा तांबडा पांढऱ्या रंगाचा नांगराचा बैल अचानक मृत्युमुखी पडला. कुटुंबीय व ग्रामस्थांनी दुःखद अंतःकरणाने त्याला गावाबाहेर न्हेत सुरक्षित जागी ठेवले. नैसर्गिकरित्या याची भनक लागताच २१ जुलै रोजी सुरवातीला २५ ते २६ गिधाडे त्याठिकाणी उतरली. दुसऱ्या दिवशी हा आकडा सुमारे ६० ते ६५ च्या दरम्यान पोहचला. दुर्मिळ गिधाडे पुन्हा अवतरल्याने व त्यांची संख्या अधिकच वाढल्याने ग्रामस्थ अचंबित झाले. भावेश रटाटे या तरुणाने आपल्याकडील कमेऱ्याद्वारे अत्यंत कसबीने शंभर फुटापेक्षा लांबून त्यांचे छायाचित्र काढले. त्यात या गिधाडांच्या अनेक लकबी व आकाशात घेतलेल्या झेपा कैद झाल्या.

हेही वाचा-गुड न्यूज : ऑफलाईन प्रवेशप्रक्रियेस रत्नागिरी, सिंधुदुर्गला परवानगी.. -

गिधाडे ही अन्न साखळीतील महत्वाचा दुवा आहेत. त्यांचे मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस असते. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी (बाकदार चोच, टोकदार नखे इत्यादी ) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरती पिसे नसतात, हे त्यांना ओळखण्याची मुख्य खूण आहे. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे सोपे जाते. आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी पक्षी उपयुक्त ठरतात. याबरोबरच शेतातील पिकांकर पडणाऱ्यां किडीवर ते नियंत्रण ठेवत उपद्रवी अशा उंदरांवर व घुशींवर उपजीविका करत असल्याने ते शेतीसाठी उपकारक ठरतात.

गावातील मृत झालेले कीटक, सरपटणाऱ्या आणि कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन ते ही घाण नाहीशी करत निसर्गाचा समतोल राखतात. गिधाडांना केवळ निसर्ग अभ्यासकांनी किंवा सरकारने प्रयत्न करून वाचवण्याऐवजी समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करून त्यांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल व आपल्या अधिवासाचे रक्षण होऊ शकेल.

औषधी व विषारी रसायनं यामुळे चार पाच वर्षांत ७० टक्के गिधाडे मृत्युमुखी पडल्याने काही वर्षांत संख्या झपाट्याने कमी. पाळीव जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या औषधाचा दुष्परिणाम गिधाडांच्या लीव्हर, मूत्रपिंड यावर होऊन हे पक्षी मरून पडत असत. हे सर्वत्र अचानक घडल्याने मागील चार ते पाच वर्षांत ९७ टक्के गिधाड पक्षी नष्ट झाले. 

भारतात आढळणाऱ्या जाती
पांढरपाठी गिधाड
राज गिधाड (लाल डोक्याचे गिधाड)
युरेशियन ग्रिफॉन (करडे गिधाड),
हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड)
पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड)
काळे गिधाड (सिनेरियस गिधाड)
लांब चोचीचे गिधाड

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 65 vultures seen after eight years in Borkhat Katla in mandangad ratnagiri district