दलितवस्तीचा ८० लाखांचा निधी मागे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

कणकवली - राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे शहर दलितवस्ती विकास योजनेसाठी ८० लाख रुपयांचा निधी शिल्लक होता. कणकवली नगरपंचायतीने त्यासाठी प्रस्तावच पाठविला नाही. त्यामुळे हा निधी मागे गेला असल्याचा आरोप नगरसेवक गौतम खुडकर यांनी आज केला. या आरोपानंतर कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली.

कणकवली - राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे शहर दलितवस्ती विकास योजनेसाठी ८० लाख रुपयांचा निधी शिल्लक होता. कणकवली नगरपंचायतीने त्यासाठी प्रस्तावच पाठविला नाही. त्यामुळे हा निधी मागे गेला असल्याचा आरोप नगरसेवक गौतम खुडकर यांनी आज केला. या आरोपानंतर कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली.

कणकवली नगरपंचायतीचे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना शहर विकासाची आस्थाच नाही. त्यामुळे समाजकल्याण खात्याने विनंती करूनही त्याबाबतचे प्रस्ताव पाठविलेले नाहीत, त्यामुळे कणकवली शहर निधीपासून वंचित राहिले अशी टीका विरोधी नगरसेवकांनी केली. तर समाजकल्याण खात्याने निधी शिल्लक असल्याबाबत काहीही कळवलेले नाही, अशी भूमिका मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी मांडली.

कणकवली नगरपंचायतीची आज सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड होत्या. उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सभेला उपस्थित होते.

८० लाखांच्या निधीबाबत गौतम खुडकर यांनी प्रश्‍न मांडला. शहरातील दलितवस्ती विकास योजनेसाठी ८० लाखांचा निधी शिल्लक आहे. त्याबाबतचे प्रस्ताव नगरपंचायतीने पाठवावेत, अशी विनंती समाजकल्याण खात्याच्या सिंधुदुर्ग येथील अधिकाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाला केली होती. परंतु प्रशासन आणि पदाधिकारी या दोहोंनी निधी आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत असे श्री. खुडकर म्हणाले.

मुख्याधिकारी श्री. तावडे यांनी समाजकल्याण निधीबाबत त्या खात्याकडून कोणताच पत्रव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले. तर शहरातील दलितवस्ती साठी आवश्‍यक तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी दिली. मात्र या उत्तरानंतर विरोधी नगरसेवक समीर नलावडे, अभिजित हर्णे, गौतम खुडकर, बंडू हर्णे, किशोर राणे, मेघा गांगण यांनी आक्रमक भूमिका घेतली.

नगरपंचायतीकडून शासनाकडे दरवर्षी विविध कामांसाठी प्रस्ताव पाठवायचे असतात. त्यानंतर शासन निधी देत असते. ही बाब सत्ताधाऱ्यांना माहिती नसावी हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. दलितवस्तीसाठी ८० लाखांचा निधी उपलब्ध असतानाही तो नगरपंचायतीच्या अकार्यक्षमतेमुळे मागे जाणे ही बाब भूषणावह नाही. कुठल्या खात्याने आमच्याकडे निधी आहे, असे कळविण्यापेक्षा विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रस्ताव पाठवा. तुमच्यात धमक नसेल तर आम्ही सांगतो तसे प्रस्ताव पाठवा, आम्ही पाठपुरावा करून एक कोटी पेक्षा निधी आणून दाखवतो, असे आव्हानही बंडू हर्णे यांनी दिली.

शहरातील टेंबवाडी रस्ता प्रश्‍न विरोधकांमुळे रखडला असल्याचा आरोप नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी केला. त्याला विरोधकांनी तेवढेच प्रत्युत्तर देऊन नगराध्यक्षांचा मुद्दा खोडून काढला. टेंबवाडी रस्त्याच्या भू संपादनाची प्रक्रिया एक महिन्यात जरी सुरू करून दाखवलात तर सत्ताधारी काहीतरी काम करतात असे आम्ही मान्य करू असे आव्हान बंडू हर्णे, किशोर राणे आदींनी दिले. 

टेंबवाडी रस्त्यासाठी सन २०१० मध्ये भू संपादन प्रक्रिया सुरू होणार होती. त्यासाठी सर्व कागदपत्रे आम्ही पूर्ण केली होती. परंतु स्थानिक जमीन मालकांनी संमती पत्रे दिली. त्यानंतर रस्त्याचे सुरू करण्यात आले. मात्र आता काही संमती पत्रावरून वादंग आहेत. त्यामुळे रस्ता अडवणूकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत ठोस तोडगा काढण्याऐवजी सत्ताधारी निव्वळ फोटोसेशनपुरतीच कामे करीत आहेत, असाही आरोप विरोधकांनी केला. मात्र उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी हे आरोप धुडकावले आणि टेंबवाडीचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.

इतिवृत्ता पूर्वीच टेंडर्सना मंजुरी कशी
नगरपंचायत सभेत इतिवृत्ताला मंजुरी मिळवण्यापूर्वीच या टेंडर्सना मंजुरी कशी दिली जाते? नगरपंचायतीने कुठल्या नियमांचा आधार घेऊन टेंडर्स मंजूर केली? असा प्रश्‍न मेघा गांगण यांनी उपस्थित केला. या प्रश्‍नावर देखील अर्धा तास सत्ताधारी आणि विरोधकांत वादंग सुरू होता. सौ. गांगण यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी मंजूर चुकीच्या पद्धतीने मंजूर झालेल्या निविदा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी निविदांची प्रक्रिया योग्यच असल्याचा दावा केला. अर्धा तास सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राजश्री धुमाळे यांनी पुढाकार घेतला. 

Web Title: 80 lakh Dalit slum funds