सुधागड तालुक्यात ८० कुपोषित बालके

अमित गवळे 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पाली - येथील तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक गुरुवारी (ता.२९) पार पडली. या बैठकीत महिला व बालकल्याण विभागामार्फत सादर केलेल्या अहवालात तालुक्यात ८० बालके कुपोषित असल्याचे सांगण्यात अाले.

पाली - येथील तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक गुरुवारी (ता.२९) पार पडली. या बैठकीत महिला व बालकल्याण विभागामार्फत सादर केलेल्या अहवालात तालुक्यात ८० बालके कुपोषित असल्याचे सांगण्यात अाले.

यावेळी प्रशासना समवेत समन्वय समिती व जागरुक नागरीकांच्या सहकार्याने सुधागड तालुका शंभर टक्के कुपोषणमुक्त करणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा यांनी सांगितले. या करीता परिपुर्ण नियोजन व प्रसंगी स्वखर्चाने कृतीशिल काम करणार असल्याचे देखील समन्वय समितीच्या बैठकीत सर्वानुमते ठरले. सुधागड तालुका हा आदिवासी बहूल असुन दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेला दुर्गम तालुका आहे. येथे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था देखिल ढासळली आहे. त्याचबरोबर येथील लोकांचे दरडोई उत्पन्न सुद्धा कमी आहे. परिणामी बालकांना पोषणयुक्त आहाराची कमतरता भासत असल्याने कुपोषणाचा आकडा चिंताजनक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असून काही काळाने नव्याने कुपोषीत बालके समोर येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाच्छापूर डुबेवाडी येथे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, शबरी आवास योजना घरकुल योजनेत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात घरकुल योजनाचा लाभ मिळाला नाही मात्र अनुदान लाटले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आले. घरकुल योजनेत खोटे अंगठे व स्वाक्षरी घेतली असल्याचा आरोप समितीचे सदस्य चंद्रकांत घोसाळकर यांनी केला. सुधागड तालुक्यातील घरकुल योजनांची प्रत्यक्षात पाहणी करुन त्या संदर्भातील चौकशीअंती उपलब्ध अहवालानुसार योग्य ती कारवाई करणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष मपारा यांनी सांगितले. पाली व जांभुळपाडा प्राथमिक आरोग्यकेंद्रासह उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, शिपाई आदी रिक्त पदांमुळे आरोग्यव्यवस्था कोलमडली असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. पिक विमा योजनेची प्रक्रिया बँकेमार्फत होत असल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. १९८९ च्या महापुरात विस्तापीत झालेली मोकळ्या जागा शासनाने ताब्यात घेण्याची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या. तालुक्यात पाठबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या धरणांचे पाणी बंद झाल्याने शेतीचे व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सबंधीत विभागाने यावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या. वनविभाग, विजवितरण कार्यालय बिएसएनएल अशा विवी कार्यालयातील समस्यांवर यावेळी चर्चा करुन उपाय सुचविण्यात आले. पाली बसस्थानकाच्या नवीन इमारतीकरीता २ कोटी ३६ लाखाच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती राजेंद्र राउत यांनी दिली. यावेळी पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे, सुधागड तालुका वनक्षेत्रपाल समिर शिंदे या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांच्या कामगीरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, तहसीलदार बी. एन. निंबाळकर, समिती सदस्य राजेंद्र राऊत, चंद्रकांत घोसाळकर, अशोक मेहता, निहारिका शिर्के; आरती भातखंडे आदी सदस्यांसह सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे, राजेंद्र गांधी, निलेश शिर्के तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी नागरिक उपस्थित होते. 
 

Web Title: 80 malnourished children in Sudhagad taluka