दहावीत ९२ टक्के मिळवूनही भविष्य अंधकारमय

दहावीत ९२ टक्के मिळवूनही भविष्य अंधकारमय

ओंकार परबचा संघर्ष - इंजिनिअर व्हायचे स्वप्न पूर्ण कसे होणार; दातृत्वाची अपेक्षा

कणकवली - सुटीच्या दिवसात मोलमजुरी करून, जादा वीज बिल येण्याच्या भीतीने घरात एकच दिवा पेटवून, रोज पाच किलोमीटरची पायपीट करून ओंकारने दहावीत तब्बल ९२ टक्के गुण मिळवले. त्याला इंजिनिअर व्हायचे आहे; पण पुढच्या शिक्षणाला पैसे आणायचे कुठून, या प्रश्‍नाचे उत्तर या स्कॉलर मुलाकडेही नाही. 

परिस्थितीशी लढत दहावीत यश मिळवलेल्या कणकवली तालुक्‍यातील कळसुली गावच्या ओंकार दीनानाथ परब याच्या गुणवत्तेला तोड नाही. कष्टकरी आई-वडिलांच्या मेहनतीचे त्याने चीज करून दाखवले आहे. 

घरात अठराविश्‍वे दारिद्र्य असलेल्या दीनानाथ परब यांचा ओंकार हा मुलगा. हुंबरणेवाडी येथून पाच किलोमीटरची पायपीट करून आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत होता. त्याच्या घरात विजेचा केवळ एकच बल्ब आहे. वीज बिल भरणे शक्‍य नसल्याने केवळ अभ्यासासाठी एक बल्ब चालू ठेवून ओंकारने परिस्थितीवर मात केली. 

यासाठी दहावीत असतानाही तो रविवारचा मोलमजुरी करून शैक्षणिक खर्च भागविण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याला दहावीत उज्ज्वल यश मिळाले. दहावीच्या परीक्षेनंतर गेले चार महिने ओंकार महावितरणच्या ठेकेदाराकडे आउट सोर्सिंगची कामे करत होता. विजेच्या तारा ओढून तो पुढील शिक्षणासाठी पैसे गोळा करत होता. यंदा त्याला कणकवली महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे. बारावीतही आपण चांगले गुण मिळवणार, असा ओंकारला विश्‍वास आहे. बारावीनंतर आर्थिक सहाय्य मिळाले, तर इंजिनिअर बनण्याचे ओंकारचे स्वप्न आहे; पण आई-वडील मजुरी करत असल्याने स्वतःचे शिक्षण मग हे स्वप्न कसे पूर्ण करायचे, असा प्रश्‍न गुणवंत विद्यार्थी ओंकारसमोर आहे. 

शिकवणीची फी न परवडणारी

ओंकार अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत असला, तरी खासगी शिकवणीच्या वर्गाची फी परवडणारी नाही. त्यामुळे वर्गात जेवढे ज्ञान मिळेल त्यावर अभ्यास करून यश मिळविण्याची जिद्द ओंकार बाळगून आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या मुलांना खऱ्याअर्थाने शैक्षणिक मदतीची गरज आहे. जिल्ह्यात धार्मिकस्थळे उभारण्यासाठी कोट्यवधींचा निधी गोळा होतो. पण शैक्षणिक अर्थसाह्य पुरवणाऱ्या संस्थांचा अभाव आहे. आपल्या छोट्याशा दानातून एखाद्याचे आयुष्य फुलणार असेल, तर ओंकारसारख्या परिस्थितीने गांजलेल्या मुलांना मदतीचा हात देणारे दातृत्वाची खरी गरज आहे.

जे नागरिक आर्थिक साह्य करू इच्छितात. त्यांच्यासाठी ओंकारच्या बँक खात्याची माहिती पुढीलप्रमाणे...

नाव- ओंकार दिनानाथ परब 

 बँक ऑफ इंडिया

खाते क्रमांक- 146610510004566

IFSC कोड- BKID0001466

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com