आचरा-कणकवली मार्गावर कोंडी कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

निधीअभावी पर्यायी रस्ता रखडला - लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज

कणकवली - शहरातील पटवर्धन चौक ते कलमठ या अरुंद रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कणकवली-आशिये-फणसनगर असा नवा रस्ता तयार करण्यात आला, मात्र निधीअभावी गेली पाच वर्षे या रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे या आचरा मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

कणकवली ते फणसनगर या पर्यायी रस्त्यामधील सर्व अडथळे दूर झाले आहेत. फक्त कणकवली, आशिये, कलमठ आणि फणसनगर येथील ज्या जमीन मालकांच्या जागा रस्त्यामध्ये येत आहेत, त्यांना मोबदला देण्याची प्रतीक्षा आहे. पर्यायी रस्त्यातील बाधितांसाठी पाच कोटींच्या मोबदला रकमेची आवश्‍यकता आहे. यात पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा ७५ लाख रुपयांचा मोबदला बांधकाम खात्याकडे प्राप्त झाला आहे. उर्वरित सव्वाचार कोटींचा निधी प्राप्त झाल्यानंतर या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे, मात्र त्यासाठी किती वर्षांचा कालावधी जाणार, असा प्रश्‍न कणकवली ते आचरा प्रवास करणाऱ्या नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. 

कणकवली-आचरा मार्गावर दर तासाला एस.टी. बसेस सोडल्या जातात. याखेरीज कालावलपर्यंत जा-ये करणारे वाळू वाहतुकीचे डंपर व इतर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. यात अनेकवेळा या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर कणकवलीचे पोलिस ठाणे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आहे. वाहतूक कोंडीचा पोलिस प्रशासनाची वाहनेदेखील अडकून पडतात. त्यामुळे कणकवली पोलिस ठाणे ते पटवर्धन चौक या दरम्यान दिवसभर जादा वाहतूक पोलिस तैनात करून वाहतूक कोंडीतून मार्ग काढला जात आहे.

कणकवली-आचरा मार्गावर गणेशोत्सव तसेच उन्हाळी हंगामामध्ये वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे पर्यायी रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी सर्व घटकांतून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडूनही या मार्गासाठी निधी देण्याची मागणी वारंवार राज्यशासनाकडे केली जात आहे. परंतु निधीच उपलब्ध होत नसल्याने आचरा बायपास रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. या प्रश्‍नी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पाठपुरावा करावा, अशीही मागणी होत आहे.

Web Title: aachara-kankavali traffic issue